एका रात्रीसाठी १ लाखापर्यंत भाडे; अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यावरही बेत
नवी मुंबई : सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांनी पनवेलमधील शेतघर, लोणावळ्यातील बंगलो आणि अलिबागमधील समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली आहे. मुंबईत ड्रन्क अॅण्ड ड्राइव्हसाठी लागू करण्यात आलेले पोलिसांचे कडक नियम आणि भर रस्त्यात होणाऱ्या तपासणीपासून सुटका व्हावी म्हणून अनेक मित्रमंडळींनी या तीन ठिकाणांना जाणे सोयीस्कर समजले आहे.
त्या दृष्टीने आरक्षण सुरू झाले असून एका शेतघर व बंगल्याचा दर एक लाखापेक्षा जास्त गेला असून अलिबागला हा दर तीस हजारांपर्यंत आहे. त्यामुळे ग्रुप बुकिंगशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
पनवेल तालुक्यातील पूर्व भागात खूप मोठय़ा प्रमाणात नवी मुंबई, पनवेल आणि उरणकर ग्रामस्थांचे शेतघर आहेत. शंभरपेक्षा जास्त शेतघरे आहेत. स्थानिक रहिवाशी आगरी कोळी पद्धतीचे जेवणपुरवठा करीत असल्याने या शेतघर मेजवानींना मोठी मागणी आहे.
तासाभराच्या प्रवासावर असलेले लोणावळा-खंडाळ्यातील बंगले तसेच एकविरा देवीच्या पायथ्याशी असलेली आगरी कोळींची घरे ही या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहेत. या बंगल्यांचे दर एका रात्रीसाठी एक लाखापेक्षा जास्त आहेत. त्यात तरणतलाव असलेल्या बंगल्यांना जास्त पसंती आहे. मागील दोन वर्षे अॅम्बी व्हॅलीचा कारभार आटोपल्याने लोणावळ्यातील बंगल्यांना उच्चभ्रू श्रीमंतांची मागणी जास्त आहे. येथील बहुतांशी बंगल्यांना सजवण्यात आले आहे, तर आरक्षणासाठी ऑनलाइन मागणी वाढली आहे. लोणावळा-खंडाळ्यात यंदा थंडीचे प्रमाण जास्त असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
या दोन ठिकाणांनंतर पश्चिम बाजूस असलेल्या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याच्या घरे व हॉटेल्सना सर्वाधिक पसंती देण्यात आलेली आहे. या ठिकाणीही एका रात्रीसाठी तीस ते पन्नास हजार रुपयांची मागणी केली जात आहे.
पोपटी पाटर्य़ाना मागणी
हिवाळ्यात रायगड जिल्ह्य़ात पोपटी पाटर्य़ाना महत्त्व आहे. याची समाजमाध्यमाद्वारे जाहिरात करण्यात आली आहे. दहा लोकांसाठी १६५० प्रति माणसे दर आकारण्यात आला असून यात राहण्याची सोय आहे. अशाच प्रकारे मांसाहारी पोपटीसाठी २२५० रुपये आकारण्यात आले आहेत. तिसरा पॅकेज २६५० रुपयांचा असून यात आलिशान बंगला देण्यात येणार आहे. कमीत कमी दहा लोकांसाठी हे आयोजन करण्यात येणार आहे, असे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
अमली पदार्थावर आठ दिवसांपासून लक्ष
३१ डिसेंबरच्या पार्टीच्या नावाखाली धुडगूस घालत अमली पदार्थाचे सेवन केले जाऊ शकते. या पाश्र्वभूमीवर अमली पदार्थ विरोध पथक आठ दिवसांपासून सतर्क झाले असून लक्ष ठेवून आहे.
नववर्षांचे स्वागत होत असताना पोलीस बंदोबस्तही सर्वत्र चोख ठेवण्यात येणार असून सर्व मुख्य रस्ते तसेच खासगी ठिकाणीही नजर असणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत जशी परिमंडळ एकमध्ये आलिशान हॉटेल्स आहेत तसेच परिमंडळ दोनमध्ये रिसॉर्ट आणि शेतघर भाडय़ाने घेत मजा करण्याचा बेत आहे. पनवेल परिसरात नेरे, आकुर्ली, खोप्रोली, वावंजे, भिंगारी परिसरात शेतघर आणि रिसॉर्ट मोठय़ा प्रमाणात असून त्या ठिकाणीही पोलिसांनी पाळत ठेवली आहे.
१६५० शाकाहारी
२२५० मांसाहारी
रुपये प्रति माणशी दर