अतिक्रमण रोखण्यासाठी नामी शक्कल, सिडको प्रशासनासाठी धडा
सिडको प्रशासनाची वसाहतींमधील पदपथावरील अतिक्रमणांची मोहीम थंडावल्याने आपल्या हक्काची पदपथ किमान सामान्यांच्या वाटेला राहावी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या खारघर वसाहतीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लीना गरड यांनी शहर परिसरात पदपथांवर १११ काँक्रीटची बाके उभारून सिडकोच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.
खारघर वसाहत ही सिडको प्रशासनाच्या मानाच्या तुऱ्यातील एक वसाहत आहे. मात्र १५ वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही याच वसाहतीमधील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी सिडको प्रशासन देऊ शकले नाही. येथील पदपथांवर टपरीचालक, फेरीवाले विसावले आहेत. तर काही ठिकाणी राजकीय पक्षांची कार्यालये थाटली आहेत. तर फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र ‘हॉकर्स झोन’ नसल्याने त्यांनी हातपाय पसरले आहेत. अनेक राजकीय मंडळींनी आपला आठवडे बाजार व सेक्टरच्या हद्दीप्रमाणे रस्त्यांवरील व पदपथांवरील या फेरीवाल्यांना आश्रय दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या गरड यांनी सेक्टर ६ ते १० व १२ ते २० या दरम्यानच्या पदपथावर पाच लाख रुपये खर्च करून १११ बाके उभारली आहेत. पदपथांवरील ही बाके बसविण्यासाठी त्यांनी सिडको प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र ती परवानगी देण्यासाठी सिडकोने उशीर केल्यामुळे त्यांनी स्वयंस्फूर्तीने ही बाके उभारली आहेत. सध्या या बाकांचा सर्वाधिक लाभ लहानग्या मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. शहरातील नागरिकांच्या चालण्याच्या हक्काच्या वाटेवर पुन्हा टपरीचालक किंवा फेरीवाल्यांना हक्क सांगू नये म्हणून ही आगळीवेगळी युक्ती भाजपने लढवली आहे.
खारघर फोरम
याच गरड यांनी खारघर फोरमची स्थापना केली होती. खारघरमधील स्थानिकांच्या विरोधात बंड पुकारून अमराठी व परराज्यातून येथे स्थलांतरित झालेल्या मतदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न फोरमने केला होता. गरड यांनी खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या पतीच्या संपत्तीचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.