नवी मुंबईतील खैरणे भागात जुन्या वादातून चार जणांनी एका व्यक्तीला कार्यालयात घुसून जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाण प्रकरणी गुरुवारी पहाटे आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आले नाही. कैस जाफर पटेल, सुफीयान दिवाण फक्की, निफाज पटेल, ताहीर पटेल असे आरोपींची नावे आहेत. तर फिर्यादी कासीम सलमानी हे आहेत.
हेही वाचा- नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे; जबाबदार व्यक्तींवर कारवाई आवश्यक : उच्च न्यायालय
कार्यालयात घसून फिर्यादीस मारहाण
बुधवारी फिर्यादी कासीम हे कोपरखैरणे नोड मधील खैरणे गावातील श्री. बालजी रियल इस्टेट कार्यालयात नेहमीप्रमाणे काम करीत होते. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास कैस जाफर पटेल आणि सुफीयान फक्की यांनी दरवाजातून प्रवेश करीत कासीम यांना माराहाण सुरु केली. यात त्यांनी त्याच ठिकाणी फरशी पुसण्याच्या काठीने व लोखंडी सळईने जोरदार मारहाण केली. मारहाणीसोबत फिर्यादीस शिविगाळही करण्यात आल्याचे तक्रारीत म्हणले आहे.
हेही वाचा- पनवेल : कंटेनर-दुचाकी भीषण अपघातात तरुणींचा मृत्यू
मारहाणीत फिर्यादीचा हात फ्रँक्चर
या घटनेनंतर कासीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा एक हात फ्रँक्चर झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जात असताना सर्व आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकी दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार केली तर बघून घेऊ अशी धमकीही दिली. या प्रकरणी कासीम यांनी स्वतःवर उपचार केल्यानंतर थेट कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी एक पथक आरोपींच्या शोधार्थ धाडले आहे. मात्र, सकाळपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. हा प्रकार जुन्या वादातून घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी आणि फिर्यादी दोन्ही एकाच परिसरात राहणारे असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. लवकरच आरोपी कोठडीत असतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी दिली.