२ महिन्यांत विमानतळपूर्व कामे पूर्ण होण्याचा सिडकोला विश्वास

पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून किमान मालवाहतूक विमानाचे पहिले उड्डाण व्हावे यासाठी सिडको प्रयत्नशील असून विमानतळपूर्व कामातील सपाटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. सपाटीकरणाच्या कामात उडणाऱ्या धुरळ्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी मातीची वाहतूक करणाऱ्या गाडय़ा अडविल्या होत्या.

नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोने दोन वर्षांपूर्वी दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे काढलेली आहेत. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे व येथील नदीचा प्रवाह बदलणे अशा चार महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ही कामे ८५ टक्के पूर्ण झाली असून येत्या दोन महिन्यांत विमानतळपूर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास सिडकोला आहे. याच काळात विमानतळाच्या दक्षिण बाजूकडून धावपट्टीच्या कामाला विमानतळ बांधकाम कंपनीने सुरुवात केली असून हे काम पाच ते दहा टक्के पूर्ण झाले आहे. धावपट्टीसाठी सपाटीकरणाचा वेग जास्त असून याच भागात साडेतीन किलोमीटर लांबीची धावपट्टी केली जाणार आहे.

पुढील वर्षी या विमानतळावरील धावपट्टीवरून किमान मालवाहतूक करणाऱ्या विमानाचे उड्डाण व्हावे यासाठी शासन व सिडको प्रयत्नशील आहे. यापूर्वी हे उड्डाण डिसेंबर २०१९ पर्यंत करण्याची मुदत जाहीर करण्यात आली होती, पण दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. दहा गावांपैकी चार गावातील काही सार्वजनिक मागण्या अद्याप शिल्लक असल्याने हे पुनर्वसन १०० टक्के पूर्ण झालेले नाही, पण तेही यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होईल असा आशावाद सिडकोचा आहे.

वर्षभरात पहिले उड्डाण होईल का?

राज्य शासनाने विमानतळ उभारणीत येणाऱ्या नवनवीन अडथळ्यांमुळे येथील पहिले उड्डाण तीन ते चार महिने पुढे ढकललेले आहे. त्यामुळे डिसेंबर १९ मध्ये होणारे उड्डाण आता मार्च किंवा एप्रिल २०२० मध्ये होण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आता केवळ एक वर्ष शिल्लक राहिले असून या काळात पहिले उड्डाण होईल का? याबाबत जाणकार साशंक आहेत. विमानतळपूर्व कामे करताना निर्माण झालेला पर्यावरणाच्या प्रश्नावरून प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असल्याने हे उड्डाणही लांबणीवर पडेल का, याची भीती व्यक्त केली जात आहे.