नवी मुंबई : बेलापूर येथील सिडको भवनाच्या इमारतीसमोरील मोकळी जागा टाटा पावर कंपनीची असून टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या तारांखाली सिडको मंडळ धोकादायक वाहनतळ चालवित आहे. सिडको भवनात काम करणारे कर्मचारी आणि अभ्यागतांची वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न शहरांचे शिल्पकार अशी बिरुदावली लावणाऱ्या सिडको प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बांधकामाच्या परवानगी इतरांना देताना कायद्याच्या पुस्तकावर बोट ठेऊन नियम दाखवून परवानगी देणारी सिडको स्वताच्या नियोजनात मात्र पळवाट शोधत असल्याचे या निमित्ताने दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेलापूर परिसरात येणाऱ्या दळणवळणाच्या नियोजनाचा विचार करुन सिडको भवन केंद्रस्थानी असावे यासाठी या भवनाची निर्माण येथे करण्यात आले. मात्र या भवनातील कर्मचारी, अधिकारी हे स्वता कधी मोटारीने कार्यालयात कामावर येतील असा कोणताही विचार त्यावेळच्या नियोजनकर्त्यांनी केला नसल्याने वाहनतळाचा हा गोंधळ उडाला आहे. सध्या सहव्यवस्थापकीय संचालक आणि इतर वर्ग एकमधील अधिकाऱ्यांची वाहने सुद्धा विजेच्या उच्चदाबाच्या वाहिनीतील बेकायदा वाहनतळावर पार्क केली जातात. याच बेकायदा वाहनतळावर मोटारी व्यवस्थित लावण्यासाठी सिडकोने येथे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच वाहने व त्यातील वस्तूंची चोरी होऊ नये म्हणून येथे सिडको मंडळाने सीसीटिव्ही कॅमेरे बेकायदा लावले आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यावर टाटा कंपनीने सिडको मंडळाला पत्र लिहून संबंधित जागा टाटा कंपनीच्या मालकीची असून ती मोकळी करावी, असे लेखी पत्र पाठविले आहे. या पत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण

सिडकोला नवीन इमारतीची गरज

५४ वर्षे झालेल्या सिडकोला नवीन इमारतीची गरज आहे. वारंवार जुन्या इमारतीची डागडुजी केली जात आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधल्यास त्यामध्ये मुबलक दालने, सभागृह, तीन मजली वाहनतळ अशी सोय करावी लागणार आहे. नवीन इमारत सिडकोने बांधावी असा प्रस्ताव यापूर्वी सिडकोच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांनी मांडली होती. मात्र त्यावर नगरविकास विभागाने गांभीर्याने विचार केला गेला नाही. भविष्यातील सिडको भवनाची नवीन इमारत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी उलवे नोडजवळ असल्यास अटलसेतूमार्गे मुंबई व नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ती प्रशस्त उभारण्याचे त्या प्रस्तावात म्हटले होते. सिडको मंडळाचे अजूनही नैना प्रकल्प व इतर प्रकल्प उभारणीचे काम पनवेल, उरण तालुक्यात शिल्लक आहे. उलवे येथून अधिका-यांना मंत्रालय, सिडकोचे निर्मल भवनातील कार्यालय नजीक येऊ शकेल. बेलापूर येथील सिडको भवनासह वाहनतळाचा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, कोकण भवन, केंद्रीय सरकारी कार्यालय (सीबीडी) या इमारतींमध्ये कर्मचारी व अभ्यांगतांना सुद्दा भेडसावत आहेत. या परिसरात रस्त्यावर वाहने उभी करावी लागत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

इतरांसाठी नियम

विकसकांना वाहनतळाचे नियम लावणा-या सिडको मंडळ स्वताच्या सिडको भवनाच्या इमारतीच्या वाहनतळा विषयी हे नियम स्वतावर कधी बंधनकारक करणार असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belapur cidco bhavan parking building in danger due to high power electric supply tata power company css