नवी मुंबई : भारतीय जनता पक्षासाठी एरव्ही सुरक्षित वाटणारा बेलापूर विधानसभा मतदारसंघ संदीप नाईक यांच्या बंडखोरीमुळे आव्हानात्मक ठरू लागल्याचे लक्षात येताच भाजपच्या रणनीतीकारांनी या मतदारसंघात गोवा राज्यातून आलेली आमदारांची अधिकची कुमक तैनात केली असून उमेदवारापेक्षा चिन्हावर भर देत प्रचार आखणीतही मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

२०१४ पासून हा मतदारसंघ भाजपला पोषक मानला जातो. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पुरेशा प्रमाणात मिळत नसलेली साथ, विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्वभावाविषयी उभे रहात असलेले ‘कथानक’ आणि प्रत्यक्ष प्रचारात कमकुवत ठरत असलेला यंत्रणेचा मुद्दा भाजपच्या गोटात चितेंचा ठरू लागला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात ‘कमळ’ केंद्रित प्रचारावर भर दिला जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या प्रचारात चिन्ह कसे केंद्रस्थानी ठरेल याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार होते. म्हस्के यांना बेलापूर मतदारसंघातून १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य यापेक्षा जास्त होते. पाच वर्षांपूर्वी म्हात्रे याच मतदारसंघातून ४३ हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. असे असताना लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य आणि संदीप नाईक यांची उमेदवारी यामुळे भाजपच्या रणनितीकारांना या मतदारसंघात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.

Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
Vijay chougule vs bjp ganesh naik
ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल
bjp expelled sandeep naik after 20 days of campaigning
नवी मुंबईत भाजपला उपरती, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात संदीप नाईकांची पक्षातून हकालपट्टी, भाजपची धावाधाव
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

हेही वाचा – आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

भाजपच्या सुरक्षित मतदारसंघांच्या यादीत बेलापूर हा सुरुवातीला अग्रक्रमावर मानला जात होता. २०१४ नंतर देशात बदललेल्या राजकीय समीकरणात बेलापूरने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तसा धोका नाही असा दावा भाजपच्या गोटातून केला जात होता. मात्र विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देताच संदीप यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी घेतली आणि येथील चुरस वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार म्हणून दहा वर्षांत मंदा म्हात्रे यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद फारसा चांगला नव्हता असा प्रचार नाईक समर्थक करताना दिसत आहेत. याशिवाय अनेकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा प्रचारात पद्धतशीरपणे आणला जात आहे. आमदार म्हात्रे मित्रपक्षांच्या दूर भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जुमानत नाहीत हा मुद्दाही त्यांचे विरोधक आक्रमकपणे मांडू लागले असून हे ‘कथानक’ निवडणुकीचा केंद्रस्थानी येत असल्याचे लक्षात येताच भाजपच्या रणनीतीकारांनी गेल्या काही दिवसांपासून बेलापूरची निवडणूक हाती घेतल्याचे पहायला मिळत आहे.

गोव्याची रसद आणि चिन्हाचा प्रचार

गोवा राज्यातून भाजपचे बडे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोकसभा क्षेत्रातील विधानसभा परिसरात मोहिमेवर असून बेलापूरवर त्यांनी अधिकचे लक्ष केंद्रित केल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गोव्यातील काही आमदारांची कुमक बेलापूरमध्ये तैनात करण्यात आली असून या मतदारसंघातील बदलते ‘कथानक’ लक्षात घेता उमेदवाराऐवजी चिन्हावर भर द्या अशा स्पष्ट सूचना प्रचार यंत्रणांना देण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा – नवी मुंबईत भाजपला उपरती, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात संदीप नाईकांची पक्षातून हकालपट्टी, भाजपची धावाधाव

पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे आदेश

राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात फिरणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून तरी नवी मुंबईत प्रत्यक्ष दौरा केलेला नाही. असे असले तरी शिंदे सेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खूश नाहीत. स्थानिक पातळीवरील प्रचारातही सुसूत्रता आणण्याची धडपड सध्या पक्षाकडून सुरू असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण फळी या भागात ‘कमळ’ घेऊन उतरविण्यात आल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. सुरुवातीला वाटत होता तितका हा मतदारसंघ सोपा राहिला नसल्याची जाणीव आम्हाला झाली असून त्यामुळे याठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे वरिष्ठांचे आदेश आले आहेत, असेही या नेत्याने लोकसत्ताला सांगितले.