बेलपाडा
रायगड जिल्ह्य़ाच्या उत्तर बाजूस बेलपाडा नावाचे एक गाव आहे. या गावापासूनच रायगड जिल्ह्य़ाची हद्द सुरू होते. खारघरचाच एक भाग असलेले हे गाव भाजीपाला पिकविण्यासाठी प्रसिद्ध होते. या गावातील भाजीपाला थेट मुंबई, ठाण्यापर्यंत विकला जात होता. शेतीवाडी, किरकोळ मासेमारी आणि भाजीपाला उत्पादनाच्या जोरावर हे गाव रायगड जिल्ह्य़ातील एक स्वयंपूर्ण गाव म्हणून ओळखले जात होते.
पनवेल शहर हाकेच्या अंतरावर असूनही पनवेलमध्ये जाण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना तळोजाचा वळसा घालून पनवेल गाठावे लागत होते. त्यामुळे या गावातील रोटी-बेटी, शिक्षण आणि व्यापार हा ठाणे जिल्ह्य़ातील बेलापूर आणि इतर गावांबरोबरच जास्त होत होता. शीव-पनवेल महामार्गाला खेटून असलेल्या या गावात आग्रोलीनंतर एक गाव एक गणपती व गोकुळ अष्टमीची संकल्पना राबवली गेली होती; मात्र कालांतराने ही संकल्पना मागे पडली. ठाणे जिल्ह्य़ाच्या शेवटच्या बेलापूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अलीकडे या गावची फारशी ओळख नाही. मात्र शेतीवाडी, किरकोळ मासेमारी आणि भाजीपाला उत्पादनाच्या जोरावर हे गाव रायगड जिल्ह्य़ातील एक स्वयंपूर्ण गाव म्हणून ओळखले जात होते. चारही बाजूने शेती आणि पश्चिमेला खाडी अशी या गावची भौगोलिक रचना. आज वसलेल्या आरबीआय वसाहतीजवळून या गावाची हद्द सुरू होते. पाटील, म्हात्रे, बारसे, बोंडे, मोरबेकर, घरत आणि कोळी अशी बोटावर मोजण्याइतकी कुटुंबे या गावात होती. त्यांचा आता विस्तार होऊन ही कुटुंब संख्या पाचशे ते सहाशेच्या घरात गेली आहे. पावसाळ्यात भातशेती झाली की दिवाळीनंतर या गावातील प्रत्येक घर भाजीचे पूरक उत्पन्न घेत होते. गावाच्या आसपास पंचवीस एक विहिरी असल्याने या भाजीसाठी लागणारे पाणी मुबलक होते. टोमॅटो, दुधी, वांगी, शिराळी, तोंडली या भाज्यांचे उत्पन्न घेण्यात गावातील ग्रामस्थांचा हातखंडा होता. यात टोमॅटोचे गाव अशीही एक ओळख या गावाची झाली होती. जवळपास रोजगार उपलब्ध नसल्याने या भाजीवर गावातील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यामुळे ताजी आणि सेंद्रिय खतावर पिकवलेल्या बेलपाडय़ातील भाजीला मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये मोठी मागणी होती. मुंबई, ठाण्यात सध्या वाडा, जव्हार, मोखाडा येथून जशा रानभाज्या घेऊन आदिवासी वा ग्रामस्थ विकण्यास येतात, त्याचप्रमाणे बेलपाडा येथील ग्रामस्थ मुंबईत ही भाजी होडीद्वारे विकण्यास नेत होते. पनवेल ही मोठी बाजारपेठ जवळ होती, पण त्या ठिकाणी भाजी विकण्यास नेण्यासाठी पहिल्यांदा तळोजा येथे दहा किलोमीटरची पायपीट करून जावे लागत असल्याने बेलपाडा ग्रामस्थ हा वळसा टाळत असत.
त्यावेळी शीव-पनवेल रस्ता अस्तित्वात नव्हता. मुंबई, बेलापूर, ठाणे येथे बेलपाडा येथील भाजी प्रसिद्ध होती. याच विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून ग्रामस्थ गरजा व मुलांचे शिक्षण करीत होते. गावातील दोन चार ग्रामस्थांच्या ओटीवर चौथीपर्यंत शाळा भरविली जात होती. घरे ऐसपैस आणि मोठी असल्याने अनेक घरांत शाळा भरविण्याचा आनंद ग्रामस्थ घेत होते. त्यानंतरच्या माध्यमिक शाळेसाठी मात्र खाडीपार करून बेलापूरची शिक्षण प्रसारक शाळा गाठावी लागत होती. ६०च्या दशकात गावात झालेली जिल्हा परिषदेची शाळा आता जर्जर झाली आहे. तिचे छप्पर आणि लाकडाचे वासे पडायला आले आहेत. त्यामुळे जवळच्या समाजमंदिरात ही शाळा सध्या भरविली जाते. रायगड जिल्हा परिषद त्या जुन्या शाळेकडे लक्ष देत नसल्याची खंत ग्रामस्थांची आहे. गावात खडतर शिक्षण घेऊन गोकुळ घरत यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याने ते नंतर शिक्षक झाले. बेलापूरजवळील आग्रोली गावात कॉम्रेड पाटील यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या एक गाव एक गणपतीची प्रेरणा या गावानेही घेतली. त्यामुळे गावात २६ वर्षे एक गाव एक गणपती संकल्पना राबविली गेली. त्यावेळी प्रत्येक घर या गणपती बाप्पाची सेवा करण्यात गुंतलेले होते. अशीच सामाजिक बांधिलकी गोकुळाष्टमीच्या सणाला जपली जात होती.
गावातील काही तुरळक मतभेदांमुळे नंतर गावातील एक गाव एक गणपतीच्या ऐवजी अनेक घरे अनेक गणपती बसविले गेले. गावात विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात २० वर्षांपूर्वी हे विठ्ठल रखुमाईचे लक्षवेधी मंदिर बांधले आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने एकत्र येऊन गावासाठी विठ्ठल रुखमाईचे मंदिर उभारले आहे. विविध देवांच्या मंदिरांचाच अभाव असल्याने जत्रा आणि यात्रा यांचा फारसा संबंध या गावात नव्हता, मात्र शेतीवर नितांत प्रेम करणारा येथील शेतकरी जून महिन्यात पेरणीच्या वेळी मात्र घरोघरी जत्रा साजरी करीत होता. चमचमीत खाण्यापिण्याची आबाळ असलेल्या या गावात त्यानिमित्ताने मांसाहार आणि नातेवाईकांचे आगत स्वागत होत होते. साठच्या दशकात गावात नळपाणी योजना एमआयडीसीमुळे राबवली गेली. सध्या अस्तित्वात असलेल्या भारती विद्यापीठ परिसरात एमआयडीसीने उद्योगासाठी पाण्याचे बूस्टर लावले होते. तेथून नंतर ग्रामस्थांसाठी नळ योजना राबविण्यात आली. विशेष म्हणजे या पाण्याचे बिल माफ करण्यात आले होते. एमआयडीसीने या गावाची प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात ही सेवा होती, पण या सेवेची कगदोपत्री लिखापढी न झाल्याने अलीकडे एमआयडीसी ग्रामस्थांकडून पाणीबिल घेऊ लागली आहे.
त्यामुळे ग्रामस्थ काहीसे नाराज आहेत. अशीच नाराजी सिडकोवरही ग्रामस्थांची कायम आहे. शेतीवाडी मोठय़ा प्रमाणात असल्याने या गावाची सुमारे चारशे एकर जमीन सिडको शहर प्रकल्पात गेली, मात्र या जमिनीच्या बदल्यात राबविण्यात आलेल्या साडेबारा टक्के योजनेतील वितरण अद्याप पूर्ण झालेले नाही. घरटी नोकरी देण्याचे आश्वासन देणाऱ्या सिडकोने ग्रामस्थांना नोकऱ्या दिल्या नाहीत. या ग्रामस्थांच्या जमिनीवर आज खारघरसारखे सुंदर उपनगर उभे आहे, तर शीव-पनवेल महामार्गाची वाट देखील या ग्रामस्थांच्या जमिनीतून गेलेली आहे. सिडकोने अनेक प्रकल्प या गावाच्या जवळ राबविले आहेत. पांडवकडय़ाचे हिरवेगार कवच या गावाला लाभले आहे, पण शहरीकरणामध्ये हे गाव आता हरवून गेले आहे. चारही बाजूंनी उंचच उंच इमारती आणि मध्येच गावाच्या काही खुणा आजही कायम आहेत.