विमानतळ व नैना या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबरोबरच देशातील स्मार्ट सिटी कशा असाव्यात, याचा वस्तुनिष्ठ पाठ सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी शासकीय प्राधिकरणांना घालून दिला आहे. शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर शनिवार व रविवार असे दोन दिवस नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आलेल्या या स्मार्ट सिटी सादरीकरणाचा एक भाटिया पॅटर्न तयार झाल्याची चर्चा होत आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन तयार केलेल्या या सादरीकरणात सूक्ष्म बाबींचा विचार करण्यात आला असल्याने हे सादरीकरण कायमस्वरूपी खुले करण्याचा सिडकोने निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाशी येथील सिडकोच्याच प्रदर्शन केंद्रातील अर्बन म्युझियमचा एक कोपरा राखून ठेवण्यात येणार आहे.
सिडको हे राज्यातील ५५ महामंडळांपैकी एक श्रीमंत महामंडळ आहे. त्यामुळे विमानतळासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सिडकोच्या वतीने पूर्ण करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. याच विमानतळाच्या उड्डाणासाठी विशेष नियुक्ती करण्यात आलेल्या भाटिया यांनी स्मार्ट सिटी म्हणजे काय आणि ती कशी असायला हवी याचा एक आदर्श वस्तुपाठ स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या ९८ स्पर्धक संस्थांना घालून दिला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या या उपक्रमाची जाहीर स्तुती केली. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प उभा करताना सिडकोने देशात स्मार्ट सिटीची संकल्पना राबविणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ अर्बन अफेअर्स या संस्थेचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यामुळेच मानवी हस्तक्षेप कमीत कमी होईल अशा यंत्रणा राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी कालबाह्य़ झालेल्या कार्यपद्धतींना अलविदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संस्था पुनर्रचनेद्वारे नव्याने भरती करण्यात येणाऱ्या शिपायांनादेखील संगणकाचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत सिडकोत नोकरभरती केली जाणार असून, एखाद्या हुशार निष्णात अभियंत्याला स्वतंत्र प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविली जाणार जाणार आहे.
आतापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलावरून प्रकल्प फाइल्स गेल्याशिवाय प्रकल्पांना मुहूर्त लाभत नाही असे चित्र आहे. शासकीय कार्यालयात बाबा आदमच्या काळापासून सुरू असलेल्या कार्यपद्धतीला दूर करण्याचे काम या स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोची ही कार्यपद्धती सर्वच संस्थांनी अमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे सनदी अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले. सिडकोने माहितीचा हा ठेवा कायमस्वरूपी जपण्याचे ठरविले असून, वाशी येथील प्रदर्शन केंद्रातील अर्बन म्युझियम सभागृहातील भिंतीवर हे सादरीकरण कायमस्वरूपी मांडण्याचे आदेश भाटिया यांनी दिले आहेत. लाकडी फ्रेममध्ये मांडण्यात येणाऱ्या या कायमस्वरूपी माहिती केंद्राचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण केले जाणार आहे.

सिडकोत व्यवस्थापकीय पदावर आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या काही प्रकल्पांवर कायमचा ठसा सोडला आहे. अनिलकुमार लखिना यांनी आकर्षक अशा खारघर नोड व पाम बीचच्या निर्मितीला प्राधान्य दिले, तर जी एस गील यांनी सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स या प्रकल्पांना जन्म दिला. त्यानंतर आलेल्या तानाजी सत्रे यांनी मेट्रो, परवडणारी घरे आणि नैना प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. आता भाटिया यांच्या काळात विमानतळाचे काम आणि नैनाचा पथदर्शी प्रकल्प व स्मार्ट सिटीचे स्मार्ट प्रदर्शन यावर भर देण्यात आला आहे.

Story img Loader