नऊ महिन्यानंतर ‘तू म्हणशील तसं’चा पहिला प्रयोग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

जिल्ह्यातील नाट्यगृहात हळूहळू नाट्यप्रयोग सुरू झाल्यानंतर आता नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची तिसरी घंटा शनिवारी होणार आहे.सायंकाळी चार वाजता  ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग करोना महासाथीमुळे नऊ महिन्यांनंतर प्रथमच नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहे.

मार्चमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. नऊ महिन्यांनंतर करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने नाट्यगृह सुरू करण्याची मागणी नाट्य निर्मात्यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने ५० टक्के आसनक्षमतेची अट घालत परवानगी दिली होती. त्यामुळे करोनाकाळात मिळणारा प्रतिसाद व ५० टक्के आसनक्षमतेची अट यामुळे प्रयोगाचा खर्चाचा ताळमेळ कसा बसणार यामुळे प्रयोग सुरू करण्यात येत नव्हते. त्यानंतर नाट्यनिर्मात्यांनी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नाट्यगृहाच्या भाड्यात कपात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भाडेकपातही केली होती. मात्र तरीही भावे नाट्यगृहात प्रयोगासाठी नाट्यनिर्माते रस दाखवत नव्हते. अखेर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृहांत नाट्यप्रयोग सुरू झाल्यानंतर शनिवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘तू म्हणशील तसं’  या नाटकाचा पहिला प्रयोग होत आहे.  नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनेने तयारी केली आहे. प्रेक्षागृह तसेच रंगभूषा कक्षासह इतर कक्ष आणि नाट्यगृहाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रेक्षागृहातील आसनांवर एक सोडून एक रसिकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

४३ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ स्वच्छता कर्मचारी यांचा करोना अहवाल सकारात्मक आला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.  नाट्यप्रयोगाच्या वेळीही मुखपट्टी घातली असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे.