उरण : शहरातील परिसरात बोरी, भवरा आणि मोरा या तीन स्मशानभूमीत अनेक असुविधा आहेत. या तिन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार करताना नागरिकांना आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख तर असतेच, पण त्यांना अखेरचा निरोपही नीट देता येत नसल्याचे शल्यही असते. स्मशानभूमी परिसरात पसरलेला अंधार, नादुरुस्त सरण आणि परिसरातील अस्वच्छता, गळके छप्पर यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी शरीरातील मोरा येथील भवरा स्मशानभूमीतील वीज गायब झाली आहे. त्यामुळे मोबाइलच्या उजेडात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली होती. या अंत्यसंस्काराचे छायाचित्र व्हायरल झाले. या घटनेमुळे हाच का विकास असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. उरणच्या भवरा गावातील शशिकांत हुमणे यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा भवरा स्मशानभूमीकडे निघाली. मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे नातेवाईकांना काळाकुट्ट अंधार, दगडधोंडे तुडवत स्मशानभूमीकडे जावे लागले. स्मशानभूमी गाठल्यानंतर त्या ठिकाणी वीज नसल्याचे समोर आले. अखेर मोबाइलच्या उजेडात नातेवाईकांना अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे नागरिकांनी उरण नगर परिषदेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

या स्मशानभूमीत त्या दिवशी अंधार होता. येथे वीज वाहिनी आणि दिवे आहेत. मात्र येथील वीज वहिनी समाजकंटकानी तोडल्याने वीज नव्हती. याची खात्री करून घेतली आहे. पुढील काळात शहरातील स्मशानभूमीची पाहणी करून सुविधा उपलब्ध केल्या जातील.- समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद

गर्दुल्ल्यांचा अड्डा

खाडी किनाऱ्यावर असलेली ही स्मशानभूमी गर्दुल्यांचा अड्डा बनली आहे. रात्री उशिरापर्यंत दारुडे समूहाने बसतात. या दारुड्यांनी स्मशानभूमीतील बल्ब चोरले. शिवाय सर्व वायरींची नासधूस केली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून स्मशानभूमीत वीज नाही. त्यामुळे या गर्दुल्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.