मिक्स डाळींच्या पिठापासून बनवलेल्या पिवळसर खरपूस पुऱ्या आणि त्यासोबत झणझणीत मटणाचा वा कोंबडीचा रस्सा म्हणजेच अस्सल मालवणी कोंबडी-वडे. हे वडे कोकणाची खासियत आहेत. सोबत सोलकढी मालवणी जेवणाची लज्जत आणखीनच वाढवते. नेरुळमधील ‘भोजन’ या छोटेखानी हॉटेलमध्ये सध्या खवय्यांची गर्दी असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे मालवणचे असलेले व्हिक्टर फर्नाडिस यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चायनीजचा व्यवसाय आणि नंतर मालवणी खाद्यपदार्थाच्या विक्रीस व्हिक्टर यांनी सुरुवात केली. पुढे त्यांनी मालवणी पदार्थाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुकेश लुल्ला यांच्याशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. १९९७ साली त्यांनी परळ येथे ‘मुक्काम पोस्ट मालवण’ हे हॉटेल सुरू केले. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर व्हिक्टर यांनी दादरला ‘स्पेशल किनारा’ येथे नवे हॉटेल थाटले. यानंतर त्यांनी मालवणी चव नवी मुंबईतही पुरवण्याचा निश्चय केला. या उद्देशाने त्यांनी २०१२ पासून नेरुळ येथे भोजनालय सुरू केले. आरंभीला मालवणी जेवणाचा छोटेखानी स्टॉल सुरू केला. खाद्यपदार्थाना वाढती पसंती पाहून त्यांनी हॉटेल सुरू केले.

कोंबडी-वडय़ांसह येथे मालवणी जेवण, तंदुरी, भाकरी वडी, भेजा, मटन खिमा, फिशफ्राय, बिर्याणी, बासा थायलंड डिश खवय्यांसाठी उपलब्ध केली. दिवसाला १० कोंबडय़ा, आठ किलो सुरमई, पापलेट, बोंबील माशांची आवश्यकता भासते. यासाठी मालवणवरून मसाला मागवला जातो. अर्थात कोकणातील खोबऱ्याची चव अधिकच लज्जतदार करण्यावर भर असतो. वडय़ासाठी मका, तांदूळ, जिरा, बडीशेप, मूग, चणा, उदीड इत्यादी डाळींचा वापर केला जातो. यासाठी दहा कामगार कारागिरीत गुंतलेले असतात.

मटण शिजविण्यासाठी कोळशाच्या भट्टीचा वापर केला जातो. येथे मिळणाऱ्या तांदळाच्या भाकरीलाही ग्राहक पसंती देतात. सर्वच धर्माचे लोक येथील जेवणाला भरभरून प्रतिसाद देतात. नारळ आणि कोकमपासून बनवलेली सोलकढी हीसुद्धा येथील खासियत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा वावर येथे असतो. गटारी, होळी, नववर्ष आणि वाढदिवसाच्या मेजवान्यांचे जेवण येथून मागविले जाते. ग्राहक पार्सल खाद्यपदार्थाना अधिक पसंती देतात.

  • कुठे – भोजन एफ-२, शॉप नं-१०,आशीर्वाद अपार्टमेन्ट. महाराष्ट्र बँकेच्या समोर सेक्टर -३ नेरुळ
  • कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
  • संध्याकाळी- ६.३० ते ११.३०
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojan hotel nerul