सिडकोचे शिस्तप्रिय व कार्यक्षम व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या नियुक्तीला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांची बदली निश्चित मानली जात असून त्यांच्या जागी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी येणार असल्याचे जवळजवळ नक्की झाले आहे. भाटिया यांच्या जागी काही दिवसांपूर्वी सिडकोचे माजी सहव्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. केंद्र व राज्य पातळीवर होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या या महिन्यात होणार असून केंद्रीय अर्थसंकल्पामुळे या बदली सत्राला स्वल्पविराम देण्यात आला होता.
मागील काही वर्षांपासून विविध जमीन घोटाळ्यामुळे कुप्रसिद्ध झालेली सिडकोची प्रतिमा सुप्रसिद्ध करण्याचे महत्वपूर्ण काम भाटिया यांनी या तीन वर्षांच्या काळात केले आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विमानतळ प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी भाटिया यांची नियुक्ती राज्य शासनाने विशेषत्वाने केली होती. भाटिया यांनी हाती घेतलेले हे शिवधनुष्य चांगल्या प्रकारे पेलले असून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जमीन संपादन, निविदा प्रक्रिया ही कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत. आता पुढील महिन्यात केवळ विमानतळाची आर्थिक पात्रता दर्शविणारी निविदा काढणे शिल्लक ठेवले आहे. त्यासाठी चार निविदाकार निश्चित करण्यात आले असून ते या निविदा प्रक्रियेत भाग घेणार आहेत. त्यामुळे विमानतळाचा टेक ऑफ दृष्टिक्षेपात आला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच देशातील पहिली स्मार्ट सिटी व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून नवीन शहर विकास आराखडा अर्थात नैना प्रकल्प तयार करण्याचे मोठे काम भाटिया यांनी मार्गी लावले आहे. ३१ मार्चला भाटिया यांना सिडको सेवेत तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांची बदली अटळ आहे. राज्याच्या विक्रीकर विभागात असताना भाटिया यांची तीन वर्षांनंतर बदली झाली, अशी आवई उठविणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी सत्यनारायणाची महापूजा घातली होती. त्या वेळी त्यांच्या या पूजेला आवर्जून उपस्थित राहून मोठय़ा आवडीने प्रसाद घेणाऱ्या भाटिया यांनी त्यानंतर आणखी दोन वर्षे विक्रीकर विभागात काम केले. त्यामुळे विक्रीकर विभागाचे उत्पन्न पाच हजार कोटींच्या पुढे गेल्याचा किस्सा आजही विक्री कर विभागात मोठय़ा चवीने ऐकविला जात आहे. त्यामुळे भाटिया यांच्या बदलीबद्दल सिडकोत दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. सिडको हे राज्यातील ५६ महामंडळापैकी केवळ एक श्रीमंत महामंडळ असल्याने भाटिया यांचा जीव म्हणावा तसा रमला नाही, अशी चर्चा आहे पण शासनाने सोपविलेले काम इमानेइतबारे करण्याची खुबी असलेल्या भाटिया यांनी सिडकोची घडी पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे राज्याचा विक्री कर विभागात पाच वर्षे काढलेल्या भाटिया यांनी सिडकोला तीन वर्षांनंतर अलविदा करण्याचा स्वत:हून निर्णय घेतला असून ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योजनाबद्ध काम करणारे भाटिया यांनी विमानतळ कामाचा शुभारंभ होईपर्यंत तरी राहावे, असाही एक मतप्रवाह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील अधिकारी गुड बुकमध्ये भाटिया यांचे नाव असून त्यांच्यावर केंद्रातील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार होती पण त्यांच्या पत्नी अनुराधा भाटिया (त्या महावितरणमध्ये सध्या आर्थिक संचालक आहेत) मुंबईत प्रतिनियुक्ती मिळाल्याने भाटिया मुंबईच्या सेवेतच राहणार असल्याचे समजते. भाटिया यांच्या जागी तेवढेच सक्षम व मेक इन इंडिया उपक्रम यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी करणारे एमआयडीसीचे विशेष कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती केली जाणार आहे. भाटिया यांच्याबरोबरच सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा यांचीही बदली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा