महापालिकेची जनसायकल सेवा नेरुळ येथून सुरू; पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी सुविधा; १० रुपयांत अर्धातास
ठाणे, पुण्यानंतर आता नवी मुंबईतही शहरांतर्गत प्रवासासाठी महापालिकेने सायकलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नेरुळ येथून गुरुवारी‘जनसायकल’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी सायकल थांबे उपलब्ध होणार आहेत.
निवासयोग्य शहरात नवी मुंबईला दुसरे स्थान मिळाल्यामुळे पालिकेने पर्यावरणपूरक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून सायकलिंगची आवड निर्माण करण्यासाठी पालिकेने सायकल प्रणाली सुरू केली आहे. नेरुळ यथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथून प्रारंभ करण्यात आला. वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देण्यात यावे यासाठी ही योजना आहे.
प्रदूषणमुक्त, सुरक्षित, सोयीस्कर व परस्परांशी जोडणारी सहज सोपी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरात विविध महत्त्वाच्या १० ठिकाणी आकर्षक सायकल स्टॅण्ड तयार करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्य समस्यांवरदेखील मात करण्यास मदत होईल, असा विश्वास पालिनेने व्यक्त केला आहे.
पहिल्या टप्प्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ स्टेशन, वंडर्स पार्क, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, सेक्टर ६ पेट्रोल पंप, ग्रॅण्ड सेंट्रल मॉल सीवूड आणि महापालिका मुख्यालय या सहा ठिकाणी ही सेवा उपलब्ध होणार आहे.
१० रुपये अर्धा तास
३० मिनिटांकरिता १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक अर्धा तासाला ५ रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. संध्याकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत शुल्क आकारले जाणार नाही. अॅपमध्ये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट १००रु . त्यामध्ये ५ राइड्स विनामूल्य असणार आहेत. अॅपमध्ये पेटीएम, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरता येणार आहे.
नोंदणी प्रक्रिया
अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यात मोबाइल क्रमांक टाकून नोंदणी करावी. त्यानंतर नाव, ई-मेल, ओळखपत्र (पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) यांचा तपशील भरावा लागतो. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतर १०० रुपये अनामत ठेव भरून या अॅपचा वापर करता येता.
प्रणाली अशी..
सायकलीच्या वापरासाठी ‘युलू’ हे मोबाइल अॅप आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. सायकलवरील बारकोड मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये स्कॅन केल्यानंतर सायकलचे लॉक उघडण्याची सुविधा तसेच अॅपमध्ये सायकल स्टेशन असलेली नजीकची सर्व ठिकाणे दिसतील. नागरिकांनी आपले जाण्याचे ठिकाण निवडून तेथील सायकल स्टेशनवर सोडावी व अॅपद्वारे लॉक करावी.