बेरोजगारांना यापुढे रिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय करायचा असल्यास १५ ते २५ हजार रुपयांची तजवीज करूनच या व्यवसायाची स्वप्ने पाहावी लागतील. यापूर्वी दोनशे रुपयांमध्ये रिक्षा व टॅक्सीचे परवाने मिळत होते. मात्र आता तीन आसनी रिक्षाचा परवाना काढण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रामधील बेरोजगारांना १५ हजार रुपये आणि टॅक्सी परवान्यासाठी २५ हजार रुपये आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण कार्यक्षेत्राबाहेरील बेरोजगारांना रिक्षा परवाना काढण्यासाठी दहा हजार रुपये व टॅक्सी परवाना काढण्यासाठी २० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. वाहनांच्या परवान्याच्या नूतनीकरणाच्या अंतिम तारखेच्या १५ दिवसांपूर्वी संबंधित परवान्याचा अर्ज वाहन मालकाने न केल्यास या वाहन मालकांना पाच हजार रुपयांचा दंड प्रति महिना भरण्याची तरतूदही परिवहन विभागाने केली आहे. यापुढे रिक्षा व टॅक्सीचा व्यवसाय करण्यासाठी नुसत्या परवान्यावर (अनुज्ञप्तीवर) भागणार नाही. रिक्षा किंवा टॅक्सी विकत घेणे, परवाने मिळवणे यासाठी रिक्षा व्यवसाय हा लाखोंच्या घरात जाणार आहे. परिवहन विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या कॅब, मॅक्सीकॅब, पर्यटक वाहन, तात्पुरता, टप्पा वाहन, मालमोटार व परवान्यांसाठी याअगोदर दोनशे रुपये शुल्क परिवहन विभाग आकारत होते. गुरुवारपासून नवीन सुधारित नियमाप्रमाणे हे शुल्क एक हजार रुपयांप्रमाणे आकारले जाईल. तसेच राष्ट्रीय परवान्यासाठी याअगोदर ७०० रुपये लागत होते, त्यामध्ये वाढ करून गुरुवारपासून राष्ट्रीय परवान्यासाठी दोन हजार रुपये वाहनमालकांना भरावे लागणार आहेत. वाहनांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी यापूर्वी शंभर रुपये शुल्क घेण्याचा नियम होता, परंतु नवीन नियमाप्रमाणे पाच हजार रुपये परवाने नूतनीकरणासाठी लागणार आहेत.

Story img Loader