सोनेविक्रीवर एक टक्का उत्पादन शुल्क भरावे लागणार या धोरणाचा फटका सोनारांपासून ते सराफांना बसणार असल्याने सरकारच्या धोरणाविरोधात पनवेल शहरातील ६५ सराफांनी मार्च महिन्यापासून सराफ बाजार बंद ठेवला आहे. तरीही शुक्रवारी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील नामांकित सोनेविक्रीचे मोठे व्यापार बंद कसे राहतील, याची दक्षताही याच सराफांनी घेतल्याची चर्चा शहरात आहे. शहरातील वामन हरी पेठे, कल्याण, पेडणेकर, पु. ना. गाडगीळ यांसारखे सराफ उत्पादन शुल्क भरणाऱ्या दुकानांचे शटर बुधवारपासून बंद झाले असल्याने नागरिकांना सोनेखरेदी करता येणार नाही.
मार्च महिन्यापासून सराफांच्या आंदोलनाला सरकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने या सराफांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. या सराफांचा उत्पादन शुल्काला विरोध नसून उत्पादन शुल्क भरण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेला आहे. त्यामुळे लग्नसराईतही या सोनेखरेदी प्रकरणावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.
पनवेल शहरामधील वामन हरी पेठे, पेडणेकर, गाडगीळ व कल्याण ही सराफांची दुकाने रीतसर सरकारी भरणा करत असल्याने या दुकानातून सामान्यांना खरेदी करता येत होती.
सामान्य सराफांपेक्षा या दुकांनामधील सोने जरी महाग असले तरीही ऐन लग्नसराईच्या वेळी या दुकानातून मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली होती. मात्र बुधवारपासून ही चार ही दुकाने बंद झाली आहेत.
ही दुकाने का बंद झाली याचे नेमके कारण पोलिसांना सांगता आले नाही. मात्र इतर सराफांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही दुकाने बंद झाली असावीत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले. परंतु या चार दुकानांच्या बंदमुळे गुढीपाडव्याला सामान्य पनवेलकरांची मुहूर्तावरील खरेदी हुकली आहे.
आता काहीजण किमान सोन्याच्या नाण्याची तरी खरेदी करता येईल म्हणून बँका गाठण्याच्या तयारीत आहेत; परंतु गुढीपाडव्याची सुटी असल्याने शुक्रवारी बँकाही बंद असतील. त्यामुळे सोन्याची ऑनलाइन खरेदी करता येईल का, याचा पर्याय शोधण्यात येईल, असे काहीजणांनी स्पष्ट केले.

Story img Loader