नवी मुंबई : चोर चोरी करताना आपल्या कडे तिसऱ्या डोळ्याची अर्थात सीसीटीव्हीची नजर असल्याचे ओळखतात. त्यावर वेगवेगळे उपाय करून चोरी करतात. अशीच दुचाकीची चोरी कोपरखैरणे सेक्टर १९ येथे झाली. चोराने सीसीटीव्ही पासून बचाव करण्यासाठी स्वतःला टॉवेल सारख्या कपड्याने लपवले मात्र पोलिसांनी अखेर त्यांना पकडले.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथे जीवदानी माउली नावाची इमारत असून त्याच्या तळमजल्यावर दुचाकी पार्क केल्या जातात. ४ तारखेला रात्री येथील एक के टी एम दुचाकी चोरी झाली. मात्र हि बाब दुसऱ्या दिवशी अर्थात ५ तारखेला सकाळी चोरीची घटना समजली. याबाबत शुभम गोळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गाडी चोरीची तक्रार नोंदवली.
हेही वाचा >>> मॅफको परिसराला अवकळा, शीतगृह क्षेत्रात स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी
तपास करत असताना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली असता एक आरोपी दुचाकीच्या हॅन्डलचे कुलूप तोडत असताना तर दुसरा दुचाकी घेऊन जात असताना आढळून आले. दुचाकी घेऊन जात असताना आरोपीने स्वतः जवळील टॉवेल सदृश्य कपड्याने डोक्या सहित अंग झाकून घेतले व गाडी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी माग काढला असता. तांत्रिक तपासणी आणि खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा सापडला. पोलिसांच्या पथकाने जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून दुचाकी जप्त केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.