पालिका शाळांचे ६०० वर्ग डिजिटल करण्यात यश

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी पालिका शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक करण्याची पालिका आयुक्तांनी घोषणा केली होती. वर्षअखेरीस सहाशे वर्ग डिजिटल करण्यात यश आले आहे. मात्र विद्यार्थी बायोमेट्रिक हजेरीसाठी प्रणाली विकसीत करण्यात येत असून नव्या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभापासूनच बायोमेट्रिक हजेरी घ्घ्ेतली जाणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले.

पटसंख्येअभावी राज्यात सरकारी शाळा ओस पडत असताना नवी मुंबई महापालिका शाळांची पटसंख्या मात्र वाढती आहे. त्यामुळे पालिकेतर्फे नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. गेल्या वर्षी पालकांचा सीबीएससी शाळांकडे असलेला कल पाहता कोपरखरणे व सीवूड येथे पालिकेने सीबीएससी शाळा सुरू केली असून यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे खासगी शाळांशी स्पर्धा करिता यावी व पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून डिजिटल शाळा हा उपक्रम या वर्षी यशस्वी केला आहे.

ही डिजिटल यंत्रणा ‘माइण्ड टेक’ या बंगलोरस्थित कंपनीकडून राबविण्यात आली आहे. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्वच ६०० वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड बसविण्यात आले असून ईआरपी सिस्टीम राबविण्यात आली आहे. यात सर्वच माध्यमांचा अभ्यासक्रम डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अभ्यासक्रम बदलला तर तोही संस्थेतर्फे डिजिटल करून देण्यात येणार आहे. या सर्व वर्गामध्ये ‘वायफाय’ सुविधाही देण्यात आली आहे.  यात विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक करण्यात येणार आहे. आता शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक झाली असून ही यंत्रणा शैक्षणिक वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात राबविण्यात आल्याने विद्यार्थी बायोमेट्रिक हजेरी करण्यात काही अडचणी आल्या. त्यामुळे आता नवीन वर्षांच्या प्रारंभापासूनच ही प्रणाली अमलात येणार आहे. यात आपलं मूल शाळेत आल्यानंतर त्याची नोंद होताच त्याच्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे.

शाळांमध्ये शिक्षक बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी आवश्यक माहिती शिक्षकांनी ईआरपी सिस्टीममध्ये भरावयाची आहे. ही सुविधाही लवकरच उपलब्ध होईल.

-संदीप संगवे, शिक्षणाधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biometric attendance of students from june