लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : सर्वात मोठी पाणथळ म्हणून गणल्या जाणाऱ्या पाणजे पाणथळीवर पुन्हा एकदा पक्ष्यांची शाळा भरू लागली आहे. मात्र पाणथळीवर येणाऱ्या पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. दररोज लाखोंच्या संख्येने येणारे पक्षी आता शेकडोतही दिसत नसल्याने पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षी खाद्याच्या शोधत येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचे थवे उरणच्या पाणथळ्यावर जमा होऊ लागले आहेत. उरण रेल्वे स्थानक व शेवा गावा शेजारी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने निर्माण झालेल्या पाणथळ्यावर दिसत आहेत. तर तालुक्यातील सर्वात मोठ्या पाणजे पाणथळी वर ही आता पक्षी येऊ लागले आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. समुद्रातून खाडीत मासळी येण्याचे नैसर्गिक मार्ग मातीचा भराव करून बंद करण्यात आले असून त्यामुळे खाडीतील मासळीचे प्रमाण आणि पक्ष्यांचे खाद्या ही कमी झाल्याचा मासळी खाद्या असलेल्या हजारो पक्षांच्या संख्येवर परिणाम झाला आहे.
आणखी वाचा-पनवेलमध्ये जेनेरिक औषधे मिळणार
दुसरीकडे पक्ष्यांचा अधिवास असलेली पाणथळे ही नष्ट होत आहेत. याचाही परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होऊ लागला आहे. खाद्या साठी पक्षांनी भ्रमंती वाढली आहे. बहुतांशी पक्ष्यांचे खाद्या हे मासळी आहे. त्यामुळे समुद्र व खाडी किनाऱ्यावर पक्षी आपल्या खाद्याच्या शोधात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात. मात्र खाडीतील पाण्याचे प्रवाह बंद होत आहेत. त्याचप्रमाणे मासळीच्या प्रजनन चक्राची साखळी खंडित केली जात आहे. याचा परिणाम मासळीचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे.
पाणजे पाणथळीवरील येणाऱ्या पक्ष्यांचे भक्ष्य असलेल्या मासळीच्या दुष्काळी स्थितीमुळे उरणच्या पाणजे, भेंडखळ आणि जासई व इतर ठिकाणी येणारी फ्लेमिंगो व विविध जातींचे पक्षी यांची संख्या रोडावू लागली आहे.
आणखी वाचा-करंजा पाणी टंचाईवर बूस्टर लावण्याचा उपाय, सिडकोच्या जोडणीचा वेग वाढवणार
पक्षी हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक
- पृथ्वी आणि निसर्गातील प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी पक्षी ही आपली भूमिका बजावत आहेत.
- मात्र हळूहळू पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास
- त्यासाठी पाणथळ राखणे आवश्यक असल्याचे मत निसर्ग व पक्षीमित्र जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.