पनवेल: वृक्षवल्ली आम्हा सोयरे… या ब्रिदवाक्यांनी पर्यावरणासाठी झपाटलेले काही व्यापारी, सामाजिक संस्था आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वी कळंबोली येथील लोखंड पोदाल बाजारातील रस्त्यांच्या कडेला रोपे लावून त्याचे संवर्धन केले. सध्या ही रोपे १५ ते २० फुटी उंच सावली देणारी झाडे बनली आहेत.
स्वातंत्र्यदिनी समाजात वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रामदास शेवाळे प्रतिष्ठान व छत्रपती एकता ग्रुपने या सावली देणा-या झाडांचा वाढदिवस साजरा करुन सर्वांचे लक्ष वेधले. या वाढदिवसाच्या सोहळ्याला बालकांपासून जेष्ठांसह शिवसेनेचे पनवेलचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शंकर विरकर, पालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा हे उपस्थिती होते.
हेही वाचा… गाडीतून धूर निघाल्याचे सांगत दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल
कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारामध्ये रस्त्यांच्या कडेला वाहन उभे करण्याची प्रथा पडली आहे. काही वर्षांपूर्वी भकास असणा-या रस्त्याच्या कडेच्या जागेवर वृक्षसंवर्धन मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्थांकडून होत असल्याने सध्या वाहनचालकांना या मोठ्या झाडांच्या सावलीचा आधार मिळतो. आठ वर्षापूर्वी विविध रोपांची लागवड करण्यात आली होती. सध्या या रोपांचे रुपांतर मोठ्या झाडात झाल्याने वाढदिवस साजरा करुन आयोजकांनी झाडांची सजावट केली. तसेच झाडांना सेंद्रीय खत दिले. लहानसा केक आणून तो याच परिसरातील जेष्ठ नागरिकांकडून कापण्यात आला. मंगळवारी साजरा झालेल्या या अनोख्या वाढदिवसाची चर्चा परिसरात होती.