रुचिता लोंढे यांना ३८४४, तर शिवसेनेच्या स्वप्निल कुरघोडे यांना २३८७ मते

पनवेल : पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक १९ ब मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या रुचिता लोंढे या ३८४४ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेच्या स्वप्निल कुरघोडे यांना २३८७ मते मिळाली. पोटनिवडणुकीत १७८ जणांनी ‘नोटा’ला मतदान केले. सर्व फेऱ्यांमध्ये लोंढे यांच्या मतांची सरशी होती. रुचिता यांच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

फडके नाटय़गृहात मोजणीचे काम संपल्यानंतर भाजपच्या पक्ष कार्यालयापर्यंत रुचिता व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भगवा रंग उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला. मुग्धा लोंढे यांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रभाग १९ ब मधील जागी रिक्त होती.

लोंढे यांच्या प्रचारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यापासूनच सरशी मारली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि शेकाप यांनी आघाडी केली होती. मात्र आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान तितका उत्साह दिसून आला नाही. या निवडणुकीत ३३ टक्के मतदान झाले होते. विजयी झाल्यानंतर रुचिता लोंढे यांनी यशाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिले.

मारहाणप्रकरणी परेश ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा

पनवेल : पनवेल पालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांच्या सात कार्यकर्त्यांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या एका कार्यकर्त्यांला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. मतदानादरम्यान काही लोकांना पैसे वाटप केल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांत फिर्यादी तक्रारदारांनी म्हटले आहे. पनवेल पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. सायंकाळी साडेपाचनंतर परेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेकाप कार्यकर्त्यांला मारहाण केली. भाजपची काही मंडळी झोपडपट्टी परिसरात पैसे वाटत असल्याचे फिर्यादी अविनाश मकास यांना दिसले. यावरून अविनाश आणि ठाकूर समर्थक यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे  परेश ठाकूर आणि त्याच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader