नवी मुंबई : भाजपची पहिली यादी जाहीर होताच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत बेलापूर मतदारसंघात बंडाचा झेंडा रोवणाऱ्या संदीप नाईक यांची तब्बल २० दिवसांनंतर प्रचार अंतिम टप्प्यात असताना भाजपने पक्षातून हकालपट्टी केली. भाजपच्या जिल्हा कोअर समितीची एक तातडीची बैठक सोमवारी सकाळी घेण्यात आली. या बैठकीत संदीप नाईक यांच्यासह पक्षाच्या २५ माजी नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संदीप यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत, असा दावाही हा आदेश काढताना केला गेला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पक्षाने त्यांना उमेदवारी देणार नाही हे सूचित करताच संदीप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले. म्हात्रे यांना उमेदवारी मिळताच संदीप नाईक यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्यासोबत बेलापूर मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे करत असताना संदीप यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला.

हेही वाचा… बदलत्या हवामानाने स्ट्रॉबेरीचा हंगामाला विलंब

संदीप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊन जवळपास २० दिवसांचा कालावधी उलटला आहे. दिवाळीपूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते प्रचारातही उतरले आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवकांचा एक मोठा गट सक्रिय झाल्याचे चित्र असून जवळपास प्रत्येक प्रभागात ते प्रचार करत आहेत. निवडणूक प्रचाराचा अखेरचा आठवडा सुरू असताना भाजपला उपरती झाली असून संदीप यांच्यासह पक्षाच्या २५ माजी नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यामध्ये अंजली वाळुंज, दयावती शेवाळे, फशीबाई भगत, शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शशिकला पाटील, वैजयंती भगत, रुपाली भगत, जयवंत सुतार, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, शिल्पा कांबळी, नेत्रा शिर्के, सुनील पाटील, श्रद्धा गवस, गिरीश म्हात्रे, रुपाली भगत, रवींद्र इथापे, अशोक गुरखे, सुरेखा नरबागे, जयाजी नाथ, विशाल डोळस, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, सूरज पाटील या नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महिला नगरसेवकांच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पतीराजांची मात्र पक्षातून हकालपट्टी झालेली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp expelled sandeep naik after 20 days of campaigning sud 02