Ganesh Naik: नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात गणेश नाईक यांना आजवर यश आले होते. मात्र आता त्यांच्या राजकारणाला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आव्हान देण्यात येत आहे. भाजपाने गणेश नाईक यांना नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतून उमेदवारी दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र उमेदवारीला विरोध केल आहे. नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे गणेश नाईक यांनीही आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना उत्तर देताना माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, असे म्हटले. आता त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे.
गणेश नाईक काय म्हणाले?
“मागच्या वेळेला मी गाफील होतो. १९९९ ला मला फसवून हरवलं गेलं, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या फेरीत मला ७५०० मतांचे लीड मिळाले होते. माझ्या विरोधात कट रचणारे सर्व लोक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं. परमेश्वराला सांगतो की, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी तुझ्याबरोबर त्यांना ठेव”, असे विधान भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले.
शिवसेना शिंदे गटाकडून विरोध
गणेश नाईक यांच्या विधानानंतर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय चौगुले यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल सदर विधान काढले आहेत. तसेच वसंत डावखरे यांचाही उल्लेख गणेश नाईकांच्या त्या विधानात आहे. आनंद दिघे साहेबांचे फोटो लावून आम्ही मत मागतो. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवतासमान आहेत. जर गणेश नाईक यांना इतका माज आला असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ऐरोलीमधील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याशेजारी जाहीर निषेध आंदोलन करू.
हे वाचा >> नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात
नवी मुंबईत राजकीय संघर्ष
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जेमतेम नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लिम, मराठी असा मतदारांचे प्रमाण बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. याचे परिणाम येत्या निवडणुकीत काय दिसतात? याची आता चर्चा होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd