|| संतोष सावंत

खांदेश्वर, मानसरोवरमधील प्रकल्प अन्यत्र हलविण्याची पनवेल पालिका नगरसेवकांची सिडकोकडे मागणी

पनवेल : कामोठे वसाहतीतील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकांतील फोरकोर्ट परिसरात होऊ घातलेल्या सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण प्रकल्पाला पनवेल पालिकेतील काही सदस्यांनी विरोध केला   आहे. हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी भाजप आणि शेकापच्या नगरसेवकांनी केला आहे.

सिडको मंडळाचे अध्यक्षपद आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे होते. त्या काळात सिडकोने या प्रकल्पाला गती दिली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकूर यांनी, महागृहनिर्माण प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी मागणी सिडकोकडे केली आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राज्यभर राबविण्यात आली. सिडकोने तातडीने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नवी मुंबई रेल्वे स्थानकांसमोरील मोकळ्या जागा आणि शहरातील बस आगार, वाहनतळ अशा जागांचा वापर केला. सुमारे १९ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद सिडकोने दर्शविल्यानंतर ९५ हजार घरे बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. परवानग्यांची प्रक्रिया सूरू असताना विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. चार वेगवेगळ्या विकासकांना या गृहनिर्माण प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले. परंतु खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकासमोरील बस आगार आणि इतर मोकळ्या जागेवर प्रकल्पाच्या कामासाठी पत्रे उभारल्यानंतर नागरिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून या प्रकल्पाला विरोध केला. नागरिकांनी नागरी हक्क स्थापन करून नागरिकांनी एकत्र केले. विविध सामाजिक संघटना, गृहसंस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्यानंतर या परिसरातील भाजप आणि शेकापच्या पालिका सदस्यांनी नागरिकांना पाठिंबा देत प्रकल्पाला लेखी स्वरूपात विरोध केला.

प्रकल्प अन्य ठिकाणी हलवावा यासाठी भाजपच्या नऊ सदस्यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाकडे लेखी हरकत कळविली. सामान्य रहिवाशांचा विरोध असूनही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी रेल्वेस्थानक आणि बसआगार आणि वाहनतळांच्या मोकळ्या जागांवरील प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार स्पष्ट केला. त्यामुळे पालिका सदस्यांनी संताप व्यक्त केला.

‘प्रकल्पाची जागा माहीत नव्हती’

भाजपचे आमदार ठाकूर हे सिडको मंडळाचे अध्यक्ष असताना सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनीच नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या महागृहनिर्माण प्रकल्पाला परवानगी दिल्याने आमदार ठाकूर यांनी त्या वेळी प्रकल्पाला हरकत घेतली नाही असा आरोप त्यांच्यावर नागरिकांमधून होत आहे. मात्र यावर आमदार ठाकूर यांना विचारले असता त्यांनी संचालक मंडळातील बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी देताना नेमका कुठे प्रकल्प हे पाहिले नव्हते. स्थानकाशेजारी प्रकल्प येणार हे माहीत होते, मात्र स्थानकाच्या फोरकोर्ट परिसरात प्रकल्प येणार याची कल्पना नव्हती. नागरिकांच्या विरोधानंतर आमदार ठाकूर यांनी पुन्हा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क साधल्यावर चंद्र यांनी स्थानकासमोरील महागृहनिर्माण प्रकल्पामुळे वाहनतळाची जागा वाढणार आहे. तसेच अतिक्रमण होणार नाही त्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे सांगितले. ज्या वेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर या प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. नागरिकांसाठी प्रकल्प अडचणीचा ठरणार असेल तर या प्रकल्पाची जागा बदलणे योग्यच राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार सिडको मंडळाने कोणत्याही सुविधा सामान्यांना दिल्या नसल्याने भविष्यात शहर विकास आराखडय़ावर ताण आणणाऱ्या प्रकल्पाला रहिवाशांसह भाजपच्या नऊ नगरसेवकांचा विरोध आहे.  – डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक, कामोठे

Story img Loader