भारतीय जनता पक्षाने एेन दिवाळीत कामोठे परिसरातील माजी नगरसेविका संतोषी तुपे यांचे पती संदीप तुपे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. संदीप यांच्याकडे भाजपने कामोठे येथील शक्ती केंद्र प्रमुखाची जबाबदारी दिली होती. मात्र पक्षाला हवेहवेसे वाटणारे तुपे कुटुंबीय अचानक का नकोसे झाले याबाबत विविध चर्चा परिसरात केली जात आहे. यापूर्वी भाजपने माजी नगरसेविका लीना गरड यांच्याविरोधात अशाच पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून निलंबित करण्याची कारवाई केली होती. भाजपने तुपे यांच्यावरील कारवाई करताना काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पक्षाची बदनामी होईल, असे वर्तन करत असल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुपे यांच्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत असल्याच्या तक्रारी वारंवार पक्षाकडे येत असल्याने त्यांना या संदर्भात वारंवार समज दिली गेली. तसेच त्याबतचे लेखी पत्रही तुपे यांना जिल्हा भाजपच्यावतीने देण्यात आल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही तुपे यांच्या वर्तनात बदल न झाल्याने उलट त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने भाजपची बदनामी थांबवण्याकरिता संदीप तुपे यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: वारंवार हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीस्वाराला जबर मारहाण

माजी नगरसेविका तुपे यांना गेल्या पालिकेच्या निवडणूकीत ४,७५७ मते मिळाली होती. त्यांना प्रभागातील ५३ टक्के मतदान मिळाले होते. अनूसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव प्रवर्गातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तसेच खारघरमधील प्रभाग क्रमांक ५ ब मधून लीना गरड यांना ७,१६१ मते मिळाली होती. त्यांना प्रभागातील ६० टक्के मतदान झाले होते. सर्वसाधारण महिलेच्या प्रवर्गातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. पालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असूनही मराठा समाजाला दिले नसल्याने गरड यांनी मालमत्ता कराच्या मुद्यावर ठाकूर कुटूंबियांना लक्ष केले. त्यानंतर पनवेलचा कारभार ठाकूर हे मनमानीपणे चालवित असल्याचा आरोप जाहीर केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : नवी मुंबई: एपीएमसीत कांदा वधारला; अजून दरवाढ होण्याची शक्यता

याबाबत तुपे यांना विचारले असता त्यांनी आम्ही माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचेच समर्थक असून पक्षाने नोटीस बजावल्यानंतर त्याचे उत्तर देण्यासाठी थोडा विलंब झाला. मात्र तसा कोणताही गैरवर्तन पक्षाविरुद्ध केले नसून आपण भाजपमध्ये आहोत असे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपचे रायगड जिल्हा संघटन चिटणीस अविनाश कोळी यांना याबाबत विचारले असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. माजी नगरसेविका लीना गरड आणि नगरसेविका पती संदीप तुपे या दोनही पदाधिका-यांविरोधात भाजपचे आमदार ठाकूर यांनी केलेल्या कारवाईमुळे भाजपमध्ये गैरवर्तनाला जागा नाही असा संदेश इतर पदाधिका-यांना देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp party against former corporator santoshi tupe husband sandip tupe panvel news tmb 01
Show comments