गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाण पुलावरील खड्यांच्या समस्येला पनवेलमधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अखेर वैतागलेल्या नागरिकांनी नवीन एचडीएफसी बँकेसमोरील चौकात तेथेच रास्ता रोको केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडको महामंडळाला निवेदन देत नवीन पनवेल उड्डाण पुलावरील सतत खड्डेमय होणारा भाग काॅंक्रीटचा करण्याची मागणी केली होती. सिडको मंडळातील अधिकारी खड्डे बुजविण्याच्या कामाचे कंत्राट काढून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच या अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी काॅ़क्रीटीकरणाच्या कामात रस नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान भाजपच्या अनेक पदाधिका-यांनी घोषणाबाजी केली.

हेही वाचा- ‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा

आंदोलनामुळे नेरे परिसरातून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास ठप्प

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे अनेक पालिका सदस्यांना यापूर्वी नवीन पनवेल वसाहतीमधील मतदारांनी निवडून दिले आहे. त्यामुळे नवीन पनवेलवासीयांसाठी मनसेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुलावरील खडंयाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे भाजपला आंदोलन करण्याची वेळ आली. मात्र, गुरुवारच्या भाजपच्या आंदोलनात नवीन पनवेल येथील रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रोजच्या होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. भाजपाच्या आंदोलनामुळे नेरे परिसरातून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास ठप्प होती. आज तरी या आंदोलनातून कायमचा खड्यांचा प्रश्न निकाली लागेल या अपेक्षेने पावसातही आंदोलक ठाम होते.

Story img Loader