बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, अशोक गावडे, गजानन काळे यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी भाजपच्या मंदा म्हात्रे, अशोक गावडे, मनसेचे गजानन काळे यांनी शक्तिप्रदर्शन करत बेलापूर कोकणभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केले. याच वेळी नवी मुंबईतील शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या शहरप्रमुख विजय माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी (४ ऑक्टोबर ) असल्याने गुरुवारीच बेलापूर मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपने बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत बेलापूरची उमेदवारी दिल्याने मंदा म्हात्रे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे बेलापूर कोकणभवन परिसरातील वातावरण भगवेमय झाले होते. शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार म्हणून म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला, मात्र शिवसेनेच्या बहुतांश पदाधिकारी फिरकलेही नाहीत. नुकतेच भाजपवासी झालेले माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते रवींद्र इथापे, जयाजी नाथ, विनोद म्हात्रे यासह कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली असून बेलापूरची सुभेदारी लढवण्यासाठी राष्ट्रवादीतून अशोक गावडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पक्षाचा एबी अर्ज जोडला नाही. मात्र महाआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी बेलापूरची मागणी लावून धरलेल्या व नाराज झालेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती. तर मनसेचे गजानन काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे नवी मुंबईत मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे मनसे कार्यकत्य्र्यामध्ये उत्साह पाहायला मिळाला.

नवी मुंबई शहर अधिक देखणे व स्मार्ट करण्याचे स्वप्न आहे. ज्या विश्वासाने मुख्यमंत्री व पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून नवी मुंबईचा विकास अधिक गतीने करण्याचे माझे स्वप्न आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आशीर्वाद दिले आहेत.- मंदा म्हात्रे, भाजप उमेदवार बेलापूर मतदारसंघ, भाजप

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बोलावण्यात आले होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीच्या वतीनेच मी उमेदवारी अर्ज भरला असून पक्षाचा अधिकृत अमेदवारी अर्ज नंतर देणार आहे.- अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी नवी मुंबई</p>

नवी मुंबईतील दोनपैकी एक जागा शिवसेनेला सोडावी, यासाठी आम्ही आग्रही होतो. परंतु दोन्ही जागा भाजपला दिल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. नवी मुंबईत शिवसेना टिकवण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला आहे.- विजय माने,अपक्ष

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने बेलापूर मतदारसंघातून अर्ज दाखल केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमित ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे जोशाने व युवा शक्तीच्या जोरावर विजयी होण्यासाठी निवडणुक लढवत आहोत.- गजानन काळे,  उमेदवार मनसे