नवी मुंबई : वाशीकर मतदारांनी भरभरून दिलेली साथ आणि सीबीडी-बेलापूरच्या घरच्या मैदानात मंदा म्हात्रे यांना मिळालेले निर्णायक मताधिक्य यामुळे अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला कसेबसे तारल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. महाराष्ट्रातील अतिशय चुरशीच्या मतदारसंघापैकी एक मानल्या जाणाऱ्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात म्हात्रे यांनी अवघ्या ३७७ मतांनी विजय मिळवला. ग्रामीण भाग, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वसाहती अशा संमिश्र वस्त्यांमध्ये विभागल्या गेलेल्या या मतदारसंघात मतदारांचा कौलही वेगवेगळा ठरल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीच्या लढती होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. ऐरोली क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने भाजप नेते गणेश नाईक यांच्यापुढे आव्हान निर्माण होईल असे सुरुवातीला बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र नाईक यांनी चौगुले आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार एम.के.मढवी यांचा पराभव करत ९१ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. गणेश नाईक यांना एक लाख ४४ हजार २६१ तर विजय चौगुले यांना ५२ हजार ३८१ मते मिळाली. एम.के.मढवी यांना जेमतेम ३८ हजार ५७६ मतांचा पल्ला गाठता आला. चौगुले आणि मढवी यांच्या एकत्रित मतांची बेरीज देखील नाईक यांच्या जवळपास पोहचू शकली नाही. एकीकडे ऐरोलीत नाईक एकतर्फी विजय मिळवत असताना बेलापूरमध्ये मात्र चुरशीची लढत झाली. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांनी विजय मिळविताना नाईक पुत्र संदीप यांचा पराभव केला खरा, मात्र वाशी आणि बेलापूर या दोन उपनगरांनी भाजपला या निवडणुकीत तारल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेरुळमध्ये संदीप यांची सरशी, बेलापूरने मात्र विजय हुकवला

हेही वाचा…थंडीसह बाजारात मटारच्या हंगामाला सुरुवात, दरही निम्म्यावर

या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांना ९१ हजार ८५२ तर संदीप नाईक यांना ९१ हजार ४७५ मते मिळाली. शिंदेसेनेचे बंडखोर विजय नहाटा यांना १९ हजार ६४६ तर मनसेचे गजानन काळे यांना जेमतेम १७ हजार ७०४ मतांचा पल्ला गाठता आला. असे असले तरी म्हात्रे आणि नाईक यांना झालेल्या मतदानाची विभागणी लक्षात घेता वेगवेगळ्या उपनगरांवर असलेली पक्षांची छाप हा मुद्दाही निर्णायक ठरल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पासून वाशी आणि सीबीडी-बेलापूर ही दोन उपनगरे भाजपचा बालेकिल्ला मानला जातात. वाशीत एकेकाळी गणेश नाईक यांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत असे. मात्र या उपनगरात म्हात्रे यांना संदीप नाईक यांच्यापेक्षा ४२२२ मते अधिक मिळाली. वाशीतील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये म्हात्रे यांनी मताधिक्य घेतल्याचे पाहायला मिळाले. वाशीत म्हात्रे यांना मिळालेले मताधिक्य संदीप नाईक यांनी नेरुळ उपनगरात मोडले खरे, मात्र सीबीडी बेलापूर भागात ते पिछाडीवर पडले आणि तेथेच त्यांचा निसटता पराभव झाला. सीबीडी बेलापूर उपनगरात म्हात्रे या अडीच हजार मतांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर राहिल्या. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पवार, बेलापूर गाव, दिवाळे, अग्रोळी तसेच सीबीडीतील डाॅ. जयाजी नाथ, अशोक गुरखे या नाईकनिष्ठ माजी नगरसेवकांच्या प्रभागातही म्हात्रे यांना मताधिक्य मिळाले.

हेही वाचा…पनवेलमध्ये शेकापची झुंज गावांपुरतीच? शहरी पट्ट्याने शेकापला पुन्हा नाकारल्याचे चित्र

गावांमध्ये नाईक तर शहरात म्हात्रे

या मतदारसंघातील ग्रामीण भागातील १०६ बुथपैकी ७७ बुथवर नाईक यांना मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मध्यम वर्गीय तसेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र भाजपला मताधिक्य मिळाले असून वाशी सेक्टर १७, वाशी सेक्टर ४ ते ८, सीवूड, एनआरआय, सीबीडी सेक्टर १५ यासारख्या भागातून म्हात्रे यांना मोठे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांमधून असलेल्या सर्वच्या सर्व २१ बुथवर नाईक यांनी विजय मिळवला असला तरी शिरवणे झोपडपट्टी तसेच तुर्भ्यातील काही भागात विजय नाहटा यांनाही मतदान झाल्याने संदीप यांना त्याचा फटका बसला असे गणित आता बांधले जात आहे. संदीप यांचे कडवे समर्थक असलेले दशरथ भगत यांच्या वाशी गावातही संदीप यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. येथेही मंदा म्हात्रे यांनी चांगली मते घेतल्याचे पाहायला मिळाले.