पनवेल : तालुक्यातील उसर्ली गावामध्ये घरगुती गॅसमधून गॅस चोरी करणाऱ्या एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य एक जण पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार पुन्हा उजेडात आला आहे. यापूर्वी कळंबोली येथे पोलीस उपायुक्तांनी धाड टाकून टँकरमधून गॅस चोरीचे प्रकरण उजेडात आणले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उसर्ली गावाजवळील शिव मंदिराशेजारील मोकळ्या जागेत गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी सापळा रचला. एका तीन आसनी रिक्षामध्ये गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या काळ्या रंगाच्या बाटल्यात भरला जात असताना पोलिसांनी २१ वर्षीय मनोजकुमार बिश्नोई याला ताब्यात घेतले. मनोजचा साथीदार तेथून निसटला.

हेही वाचा – ‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 

मनोज हा याच परिसरातील ओमकार इमारतीमध्ये राहतो. तो मूळचा राजस्थान येथील बिकानेर जिल्ह्यातील नानेदडा गावातील रहिवासी आहे. मनोज हा एका गॅसपुरवठा करणाऱ्या एजन्सीमध्ये कामाला आहे. पोलिसांनी रिक्षासोबत भारत गॅस कंपनीचे सहा सिलिंडर जप्त केले आहेत. तसेच पोलिसांना रिक्षात लोखंडी नळी सापडली. याच लोखंडी नळीच्या माध्यमातून मनोज व त्याचा साथीदार गॅस मोठ्या बाटल्यातून काढून लहान बाटले भरत होता. काळ्याबाजारातून मिळालेले सिलिंडर तो परिसरात विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

या घटनेमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यामधून मिळणारा गॅस हा अपुरा पुरवठा होत असल्याची साशंकता रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पनवेलमध्ये गॅसचा काळाबाजार करणारी मोठी टोळी सक्रिय असून पोलिसांसोबत जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या पुरवठा विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व विनोद लभडे यांनी या प्रकरणी भादंवि. २८५, ३४ सह दि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन सप्लाय अॅण्ड डिस्ट्रिब्युशन ऑर्डर २००० ४ (१) (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सध्या मनोज याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black market of domestic gas in panvel ssb