उरण : सध्या थंडीची चाहूल लागली असून शुक्रवारी सकाळी काही प्रमाणात वातावरणात धुके होते मात्र दुपारी ३ वाजल्या नंतरही उरण शहर व परिसरात धुक्याचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे हे खरंच धुकं आहे की, हवेतील वाढते प्रदूषण अशी शंका उरण मधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या वातावरणात क्षणा क्षणाला बदल होत आहेत. याचा परिणाम मानवी जीवन आणि आयुष्यावर पडू लागला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईतील कांदळवनावर सीसीटीव्हीची नजर; वनविभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून १११ ठिकाणे निश्चित
यामध्ये लांबणारा पाऊस, वेळी अवेळी कधीही कोसळधार,उशिरा सुरू झालेली थंडी, कडक ऊन यामुळे कोणता ऋतु कधी सुरू होतो आणि संपतो याचा अंदाज येत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या उरण मधील वातावरणात दिसू लागली आहे. उरण मधील औद्योगिक परिसरात निर्माण होणारा धूर,रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असलेली धूळ याचाही परिणाम होऊन वातावरणात धुळीकणाचे प्रमाण ही वाढले आहे. दिवसभर धुरके वातावरण निर्माण होणे हे हवेतील प्रदूषणाचे लक्षण असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उरण मधील हवाही आता प्रदूषित झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.