नवी मुंबई : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्येच बच्चेकंपनीला नवी मुंबईतील नेरुळ जेट्टीवरून समूह बोट सफर करता येणार आहे. त्यामुळे रोहित पक्षी निरीक्षणासह कांदळवनांची सफर करणे पक्षी व पर्यावरणप्रेमींना शक्य होणार आहे. सिडको महामंडळात नेरुळ जेट्टीवरून प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सिडकोने नेमलेल्या वॉटरफ्रंट एक्सपीरियन्स मुंबई प्रा. लिमिटेड या कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.
नेरुळ जेट्टी ते मांडवा (अलिबाग) आणि नेरुळ जेट्टीपासून एलिफंटा तसेच ऐरोली पूल या सागरी मार्गावर बोटीने प्रवास करण्यासाठी विविध परवानग्या सिडको मंडळाने मिळवल्या आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नेरुळ येथील जेट्टीचे उद्घाटन झाले होते. सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून सिडको मंडळाने नेरुळ येथे जेट्टी उभारली. काही तांत्रिक बाबींमुळे जेट्टीवरून प्रत्यक्षात वाहतूक सुरू होऊ शकली नव्हती. नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स (दिल्ली पब्लिक स्कूल) पासून ते नेरुळ जेट्टीपर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र पुलाचे निर्माण केले आहे.
या पुलाच्या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या प्रवासानंतर जेट्टीच्या कार्यालयाची उभारणी येथे सिडकोने केली आहे. पुलावर प्रवाशांना खाद्यापदार्थ खरेदी करता यावे यासाठी सिडकोने प्रशस्त सामायिक सेंटरची उभारणी केली आहे. सुमारे पन्नास वाहने एकावेळी उभी करता येतील या क्षमतेचा वाहनतळ पुलावर उभारला आहे.
जेट्टीपर्यंत प्रवासी बोटीपर्यंत सुरक्षित चालत जाऊ शकतील असा प्रशस्त मार्गाचे नियोजन सिडकोने येथे केले आहे. सिडको मंडळाने तांत्रिक निविदा प्रक्रिया पार पाडून ‘दृष्टी लाइफ लाइन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची निवड जेट्टी ऑपरेटरसाठी केली आहे. पुढील काही वर्षे ही कंपनी जेट्टीवरील प्रवासी व मालवाहू वाहतुकीचे नियंत्रण करणार आहे. अद्याप या प्रवासी बोटीच्या प्रति आसन प्रवासाचे दर जाहीर झाले नसले, तरी सिडको मंडळाने ही सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाकडून संबंधित सागरी प्रवासी मार्गिकेची परवानगी मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
नेरुळ ते मांडवा या पल्ल्यावर रो रो प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे. या बोटीची ६०० आसन क्षमता आणि ५० वाहने या बोटीतून जाऊ शकणार आहेत. तासाभऱाच्या प्रवासात सामान्य प्रवाशांना नेरुळ जेट्टीवरून मांडवा (अलिबाग) येथे थेट जाता येईल. अर्थात ही वाहतूक समु्द्राच्या भरती ओहोटीवर अवलंबून असणार आहे. सुरुवातीला एका बोटीच्या माध्यमातूनच ही सेवा सुरू केली जाणार आहे.
नवी मुंबईतील ऐरोली परिसर आणि ठाणे खाडीक्षेत्रातील फ्लेमिंगो पक्षी निरीक्षण आणि कांदळवनांची सफर पर्यटकांना स्पीडबोटने करता येणार आहे. नेरुळ ते एलिफंटा या सागरी मार्गावर ३० मिनिटांत प्रवाशांना पोहचता येईल. या स्पीड बोटीची क्षमता २५ आसन आणि १० वाहनांची क्षमता असेल.
कुठून कुठे प्रवास?
● नेरुळ जेट्टी – मांडवा (अलिबाग) – पूर्ण प्रवासाची वेळ ६ तास
● नेरुळ जेट्टी – एलिफंटा लेणी – पूर्ण प्रवासाची वेळ ४ तास
● नेरुळ जेट्टी ते नवी मुंबईतील ऐरोली खाडीपुलापर्यंत ठाणे जिल्ह्यातील कांदळवन क्षेत्रासह रोहित पक्षी निरीक्षणसुद्धा पर्यटकांना करता येणार आहे. पूर्ण प्रवासाची वेळ एक तास.