पनवेल: डायघर येथील ठाकूरवाडीमधून मंगळवारी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या बालकाचा मृतदेह पनवेलमधील किरवली गावाजवळ संशयीतरीत्या मृतावस्थेमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. यापूर्वीही नवी मुंबईतील बेपत्ता बालकांचे प्रकरण चर्चेत आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण होते.
संबंधित बालक मूकबधिर असून त्याचा मृतदेह मुंब्रा पनवेल महामार्गावरील किरवली गावाबाहेर बुधवारी एका पाण्याच्या डबक्याशेजारी आढळला. हा मृतदेह विच्छेदनासाठी तळोजा पोलीसांनी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या मृतदेहाची तपासणी वैद्यकीय अधिकारी करत आहेत. जेथे बालकाचे शव सापडले त्या परिसरातील रहिवाशांकडे पोलीसांनी पहिल्यांदा चौकशी केली. त्यानंतर पोलीसांनी बिनतारी यंत्रणेशी संपर्क साधला. आजूबाजूच्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील ४८ तासांत १२ ते १४ वर्षे वयोगटातील किती व कोणती बालके बेपत्ता आहेत याची माहिती नवी मुंबई पोलीस दलाने मिळविली. या दरम्यान मृत बालकांच्या पालकांचा शोध लागला. संबंधित बालकाच्या पालकांनी मंगळवारी (काही तासांपूर्वी) डायघर पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार नोंदविली होती.
हेही वाचा >>>ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…
डायघर पोलीस ठाण्यातील देसई गावाजवळील ठाकूर पाड्यात हा बालक व त्याचे पालक राहतात. डायघर पोलीसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. या बालकाचा मृतदेह सापडल्याने त्याचा खून कोणी केला असावा, त्याला तळोजातील किरवली गावाजवळ कोणी व कधी आणले असावे या सर्व प्रश्नांचा शोध पोलीसांचे पथक घेत आहे. ठाणे येथील डायघर पोलीस आणि नवी मुंबई पोलीसांचे पथक या प्रकरणी संयुक्त तपास करीत आहेत. संबंधित बालकाचा खून करण्यापूर्वी त्याच्यासोबत नेमके काय झाले याबाबत माहिती वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट झाल्यावर याबाबत अधिक बोलता येईल, अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश काळदाते यांनी दिली.