पनवेल ः पनवेल शीव महामार्गालगत खारघर वसाहतीमधील मेडीकव्हर रुग्णालयाला सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बने रुग्णालय उडवून देऊ, असा ईमेल आल्याने सूरक्षा यंत्रणेसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. अखेर अडीच तास रुग्णालयाची बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यावर हा खोडसाळपणा असल्याचे सिद्ध झाले. परंतु हे अडीच तास रुग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या जिवाचा ठोका चुकविणारे होते.
हेही वाचा – नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
हेही वाचा – सोन्याची पेढी लुटणाऱ्या आरोपींना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शंभराहून अधिक रुग्ण खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सोमवारी उपचार घेत होते. यातील अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याने बॉम्बने रुग्णालयाची इमारत उडवून देण्याच्या धमकीमुळे अचानक रुग्ण इतर कोणत्या रुग्णालयात दाखल करावे, असा पेच निर्माण झाला. खारघर पोलिसांना याबाबत माहिती मेडिकव्हर रुग्णालयाच्या सूरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी विनोद राऊत यांनी कळविली. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब नष्ट करणारे पथक आणि वाढीव पोलिसांचा बंदोबस्त काही क्षणात रुग्णालयात लावण्यात आला. याच दरम्यान नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेल ज्या मेलवरुन धमकी देण्यात आली त्याच्या माग काढत होते. अखेर अडीच तासांच्या तपासणीनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. या दरम्यान रुग्ण भितीच्या सावटाखाली होते.