गणेशोत्सवाच्या काळात बोंबील मासळीची आवक वाढली असून एका बोटीला दीड ते दोन टन बोंबील मिळत असले तरी सण आणि सुट्टी यामुळे ग्राहक कमी झल्याने १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या बोंबीलाचा दर १०० रुपये किलोवर आला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे मोठे बोंबील येऊन ही दर घटल्याने मच्छिमारांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : अनंत चतुर्दशी निमित्ताने ग्राहक नसल्याने बाजारात ७०% शेतमाल पडून ; भाज्यांचे दर १० ये २०रुपयांनी गडगडले
पावसाळ्यात बोंबील मासळी ही खवय्या साठी एक पर्वणी असते खास करून बोंबील हे इतर मासळी पेक्षा स्वस्त असल्याने त्याला अधिक मागणी असते. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदी नंतर पुन्हा एकदा खोल समुद्रात मासेमारी सुरु झाली आहे. मात्र सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असल्याने अनेकदा मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या बोटींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामध्ये एका मासेमारी बोटीला एका फेरीसाठी २ ते अडीच लाखांचा खर्च येतो तो ही भरून निघत नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये पावसाने दडी मारल्याने ही मासळीची आवक कमी झाली होती अशी माहिती करंजा येथील मच्छिमार विनायक पाटील यांनी दिली आहे.
सध्या बोंबील मासळीची वाढ झाली असून मासेमारांना मोठे बोंबील मिळू लागले आहेत. मात्र गणेशोत्सव व सुट्टी च्या कारणाने ग्राहक घटल्याने बोंबीलाची आवक वाढून ही दर घटल्याची माहिती त्यांनी दिली.
अनंत चतुर्थी नंतर मागणी वाढण्याची अपेक्षा
सण आणि उपवासाचे दिवस असल्याने मासळीची मागणी कमी झाली असली तरी अनंत चतुर्थी नंतर मासळीच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा नित्यानंद कोळी यांनी व्यक्त केली आहे.