बोनकोडे

ठाणे-बेलापूर पट्टय़ात मध्यवर्ती भागात असलेले बोनकोडे गाव पुरोगामी म्हणून ओळखले जाते. पंचक्रोशीत जत्रेच्या नावाखाली होणारा मद्य आणि मांसाहाराचा अतिरेक थांबवण्यासाठी या गावाने प्रथम पुढाकार घेतला. या गावाला सुरुवातीपासूनच नेतृत्वगुणांची देणगी लाभली आहे. ब्रिटिश काळातील डिस्ट्रिक्ट बोर्डातील प्रतिनिधित्वापासून ते राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत येथील ग्रामस्थांनी गावाचे नाव विविध स्तरांवर उज्ज्वल केले आहे.

त्या काळातही बऱ्यापैकी इंग्रजी जाणणारे फकीरजी नाईक हे ब्रिटिशांच्या जिल्हा बोर्डात बेलापूर पट्टय़ाचे प्रतिनिधित्व करत. त्यांचे नातू माजी मंत्री गणेश नाईक यांनी १५ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात आपले अस्तित्व अधोरेखित केले. याशिवाय गावातील काही ग्रामस्थांनी पक्ष व पंचायत पातळीवर प्रतिनिधित्व केले.

पूर्वेला खैरणे गाव आणि विस्र्तीण शेतीवाडी. पश्चिमेला खाडीकिनारा. ज्या ठिकाणी आज बोनकोडे गावाची स्मशानभूमी आहे तिथपर्यंत खाडीचे पाणी येत असल्याने भरती गावापर्यंत येत असे. दक्षिणेला शेती आणि कोपरी व जुहूगाव. उत्तरेला शेती आणि कोपरखैरणचा काही भाग. अशा भौगोलिक रचनेत ५०-६० उंबरठय़ांचे हे १० एकरांवरील गाव आता चांगलेच विस्तारले आहे. तीन बाजूंच्या जमिनीमुळे आंबे आणि जांभळाची झाडे मोठय़ा प्रमाणात होती. तेव्हा दीडशेच्या घरात असलेली बोनकोडेची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात गेली आहे. नाईक, पाटील, म्हात्रे आणि कोळी अशा चार दिशांना चार आळ्या (वसाहती) आहेत. पोटापाण्यापुरती मासेमारी आणि पूर्णवेळ शेती केली जात असे. गुचरण जमिनीवर उगवणाऱ्या अमाप गवताचा व्यापार नाईक कुटुंबीयांनी सुरू केला. या गावातून ठाण्याला सर्वाधिक गवत विक्रीसाठी जात होते. गवताच्या व्यवसायामुळे नाईक कुटुंबाच्या हातात पैसा खेळत होता. त्यामुळे घोडे, बग्गी होती. याच कुटुंबाकडे गावाची सूत्रे बऱ्यापैकी एकवटली. गावातील तांडेल भाऊसाहेब या सर्कल अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे गावात श्रमदानाने पहिली प्राथामिक शाळा आणि नंतर विठ्ठल-रखुमाईचे मंदिर उभे राहिले. त्याआधी कोपरखैरणे येथील प्राथमिक शाळेत येथील विद्यार्थी जात. माध्यमिक शिक्षणासाठी अनेकांनी तुर्भे व घणसोलीची वाट धरली.

परशुराम नाईक हे या गावातून दहावी उत्तीर्ण झालेले पहिले विद्यार्थी ठरले. बेलापूर पट्टय़ातील सर्व गावांत अनेक मंदिरे आहेत, मात्र बोनकोडे ग्रामस्थांनी मरीआई मंदिरातच विठ्ठल-रखुमाईची प्राणप्रतिष्ठा केली. एकाच ठिकाणी नतमस्तक होण्याची शिकवण या गावाने सर्व गावांना दिली. आगरी कोळी समाजात चैत्र महिन्यातील जत्रांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळे दिघा ते दिवाळ्यापासून अनेक गावांत मराठी वर्षांरंभी अनेक जत्रांचे आयोजन केले जाते, पण बोनकोडे गावातील पुरागोमी विचारांचे पुरस्कर्ते फकीरजी गणोजी नाईक यांनी सर्व बेलापूर पट्टय़ातील गावांना एकत्र बोलावून मांसाहार, मद्यपानांचा अतिरेक करणाऱ्या जत्रा बंद करण्यात याव्यात, असा प्रस्ताव मांडला.

याच काळात देवांच्या पालख्या काढण्याची सूचनाही त्यांनी मांडली; पण काही गावांनी हा प्रस्ताव फेटाळला. ज्यांनी हा प्रस्ताव नाकारला त्या गावात आजही धूमधडाक्यात जत्रा भरविल्या जातात, तर नाईक यांचा प्रस्ताव पटलेल्या गावात याच काळात ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक काढली जाते. बोनकोडे गावातही चैत्र द्वादशीला गावात विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक काढली जाते. गावातील हा एक मोठा उत्सव मानला जातो, तर मराठी शाळेजवळ लागणारी होळी हा एक गावातील दुसरा मोठा सण. या होळीचा मान आजही पाटलांना दिला जात आहे. ‘एक गाव एक होळी’ ही परंपरा या गावाने अनेक वर्षे जपली आहे.

सत्तरच्या दशकात गावात पाणी आणि वीज आल्याची नोंद आहे. पूर्वेला बावखळेश्वपर्यंत पसरलेल्या विस्र्तीण जमिनीवर नंतर एमआयडीसीचे आरक्षण आले. त्यामुळे कॅफी, नोसिल, पील, स्टॅण्डर्ड अल्कली यांसारख्या बडय़ा रासायनिक कंपन्या आल्या. ग्रामस्थांनीही या कारखान्यात नोकऱ्या पत्करल्या. गावांचा विकास होऊ लागला. आजच्या घडीला गावातील अनेक तरुण स्वयंरोजगार आणि व्यवसायात आघाडीवर आहेत.

जवळच्या खैरणे या मुस्लीम गावातील ग्रामस्थांबरोबर झालेल्या दंगलीत यापूर्वी जीवितहानी झालेली आहे. मात्र या गावातील काही ग्रामस्थांनी त्या दंगलीत निष्पाप मुसलमानांनाही घरी आधार दिल्याची उदाहरणे आहेत.