नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन सेवेने लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांकरिता बसमध्ये ‘लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन’ च्या माध्यमातून ‘बुक्स इन बस’ या नावाने चालते फिरते ग्रंथालय हा उपक्रम सुरू केला होता. प्रवासी वाहतूक सेवेमध्ये ग्रंथालय सुविधा हा देशातील पहिला उपक्रम म्हणून पालिकेने स्वत:ची पाठ देखील थोपटून घेतली होती. मात्र आता पुस्तकांअभावी या ग्रंथालयाचे सांगाडे पडून आहेत.
परिवहन सेवेच्या २६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एनएनएमटी बसमध्ये प्रवाशांसाठी ‘बुक्स इन बस’ या उपक्रम सुरू केला होता. मराठी, इंग्रजी भाषेतील वाचनीय पुस्तके उपलब्ध करून दिली होती. याचा शुभारंभ तत्कालीन आयुक्त बांगर यांच्या उपस्थितीत केला होता. अनेक पुस्तकप्रेमींनी या उपक्रमाचे कौतुकही केले.
हेही वाचा >>>विमानतळाची धावपट्टी सज्ज; नवी मुंबई विमानतळावर प्राधिकरणाकडून आणखी एक यशस्वी चाचणी
सुरुवातीला मंत्रालय, बोरीवलीकडे जाणाऱ्या वातानुकूलित गाड्यांमध्ये संस्थेने दिलेली मराठी, इंग्रजीतील नामवंत लेखकांची पुस्तके झळकली. वर्षभरापूवीपर्यंत ही पुस्तके निर्दशनास येत होती. मात्र आता ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे दिसत आहे. सध्या एकाही बसमध्ये पुस्तक उपलब्ध नसून केवळ पुस्तकाच्या ग्रंथालयाचा सांगाडा दिसत आहेत. दरम्यान या विषयी लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला असता त्यांनी पुस्तके देण्याचे काम संस्थेने केले आहे. त्यानंतर त्याचे नियोजन व जबाबदारी ही परिवहनची आहे, असे त्यांनी सांगितले.
नियोजनाचा अभाव
पुस्तके प्रवाशांनी पळविल्याचे सांगत परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करुन सुरू केलेली ही योजना परिवहनच्या नियोजनाअभावी अयशस्वी ठरली आहे. अनेक वाचनप्रेमी प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.