प्रवासात पिण्यासाठी पाण्याची सोबत करणाऱ्या पाण्याच्या बाटलीने पाणीटंचाईच्या या काळात स्वयंपाकघरातील एक कोपरा पटकाविला असून घराला टाळे लावून कामधंद्याच्या निमित्ताने दिवसभर बाहेर जाणाऱ्या तरुण दाम्पत्याने पिण्याच्या पाण्याचे वीस लिटरचे जार आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही मोठय़ा गृहनिर्माण सोसायटींना या जोडप्यांची सोय म्हणून पाण्याचे हे जार सोसायटीच्या कार्यालयात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे बाटलीबंद पाण्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून याचा फायदा भाजी, डाळीच्या किरकोळ विक्रेत्यांप्रमाणे पाणी विक्रेत्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात ७० रुपयांना मिळणारा २० लिटरचा जार ८० ते ९० रुपयांनी मिळू लागला आहे.
या देशात कधीकाळी पाणीही विकले जाऊ शकते याची खात्री असलेल्या पार्ले समूहाने सर्वप्रथम १९९३ मध्ये बिस्लरी या बाटलीबंद मिनरल पाण्याची विक्री सुरू केली. जगात आज तीन हजारापेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याचे ब्रॅन्ड असून देशातील ही संख्या १८० पर्यंत आहे. दहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल असणाऱ्या या ब्रॅन्डमध्ये बिस्लरी, किनली, अॅक्वाफिना, हिमालय यांसारख्या नामांकित ब्रॅन्डला मोठय़ा प्रमाणात मागणी असून यापूर्वी केवळ प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यात बहुतांशी शहरी भागात पाणीकपात झाल्याने पाणीपुरवठा मर्यादित वेळेत केला जात आहे. याच वेळेत नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या पती-पत्नींची संख्याही जास्त वाढली असल्याने रात्री उशिरा घरी आल्यानंतर पाण्यावरून तू तू मै मै टाळण्यासाठी निदान बाटलीबंद पाण्याचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे या पाण्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून आठवडय़ासाठी दहा जारांची नोंदणी करणाऱ्या दुकानदारांनी याची मागणी दुप्पट ते तिप्पट नोंदवली आहे. बाटलीबंद पाण्यात १०० मिलिलिटरपासून २० लिटपर्यंत सात प्रकारात पाणी बाटलीबंद केले जात आहे. यात घरासाठी २० लिटरच्या जारांना जास्त मागणी असल्याचे किरकोळ व्यापारी महेशभाई पटेल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा