ऐरोली, घणसोली परिसरात वेळ वाचविण्यासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर
ठाणे-बेलापूर मार्गावरील चिंचपाडय़ाकडून ऐरोली रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गाकडे येण्यासाठी दुचाकीचालक व रिक्षाचालक विरुद्ध दिशेने प्रवास करतात. त्यामुळे ऐरोली रेल्वे स्थानकाकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. अशा विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऐरोलीतील रहिवासी करत आहेत.
ऐरोली रेल्वे स्थानकाजवळच्या भुयारी मार्गामधून रोज हजारो वाहनचालक प्रवास करतात. ठाणे-बेलापूर मार्गावरून ठाण्याकडून ऐरोलीकडे येणारे वाहनचालक हे या भुयारी मार्गातून शहरी भागात प्रवास करत होते. तर या ठिकाणी सिग्नल यंत्रणादेखील बसवण्यात आली होती. पण ऐरोली येथे असणाऱ्या माइंडस्पेस, रिलायबल प्लाझा या कंपन्यांतील कामगार येथील पादचारी पुलाचा वापर न करता रस्ता ओलांडूनच प्रवास करत होते. वाहनचालक व पादचारी यांच्या गर्दीमुळे भुयारी मार्गाजवळ रोज मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. म्हणून वाहतूक शाखेने अधिसूचना काढून पालिकेशी पत्रव्यवहार करत हा रस्ता ठाण्याकडून ऐरोलीकडे येणाऱ्यांसाठी बंद केला होता. तर पादचांऱ्याना देखील रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर भुयारी मार्गाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटली, मात्र त्यामुळे रिक्षाचालकांना द्राविडी प्राणायम करत भारती बिजली येथून यू-टर्न घेऊन भुयारी मार्गाजवळच्या रिक्षा थांब्यापर्यंत येणे भाग पडले. हा वळसा टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोलीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या विरुद्ध बाजूने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता ऐरोलीकडून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध बाजूने येणाऱ्या रिक्षाचालक व दुचाकीचालकांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे किरकोळ अपघातदेखील घडले आहेत. वाहतूक शाखेने यावर तोडगा काढावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
ऐरोली रेल्वे स्थानकानजीक होणारी कोंडी फोडण्यात वाहतूक शाखेला यश आले असले, तरीही ठाणे-बेलापूर मार्गावर चिंचपाडय़ाकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडीत भरत पडत आहे.
वाहनचालकांना त्रास
ठाणे-बेलापूर मार्गाच्या वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या भागात घणसोली रेल्वे स्थानकाजवळ पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर येण्यासाठी ठाण्याकडून वाशीकडे जाणारे वाहनचालक घणसोली येथील पुलाखालून मागे वळतात आणि पेट्रोल भरून झाल्यावर ठाण्याकडून बेलापूरला जाणाऱ्या मार्गावर जाण्यासाठी विरुद्ध बाजूने प्रवास करतात. त्यामुळे वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मोटार वाहन कायदा कलम २ (१९७) नुसार विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. चिंचपाडा येथून विरुद्ध बाजूने येणाऱ्या रिक्षाचालक तसेच दुचाकी चालकांवर व घणसोली पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
– ममता डिसोझा, पोलीस निरीक्षक रबाळे, वाहतूक शाखा