नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि क्रांतिकारी उपक्रम ठरलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग रविवारी देशभर प्रसारित झाला. आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
अडवली-भूतवलीमध्ये मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसह युवक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, स्वच्छतादूत, आदिवासी बांधव, बंजारा समाजाचा, व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक देशाचे भवितव्य असून तळागाळातील नागरिक आणि आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी याकरिता अडवली-भूतवली येथे मन की बात कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी दिली. मन की बात कार्यक्रम प्रसंगी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या शंभराव्या भागाबद्दल जनतेमध्ये अतिशय उत्सुकता आणि जिज्ञासा होती. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी मन की बातची सुरुवात झाली. आज ३० एप्रिल २०२३ रोजी १०० वा भाग प्रसारित झाला आहे. पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम देशातील २३ कोटींपेक्षा अधिक नागरिक नियमितपणे ऐकतात. पंतप्रधान आपल्याला आपल्या देशातील समृद्ध वारसा, संस्कृती, कला आणि परंपरेच्याजवळ मन की बात या कार्यक्रमातून घेऊन जातात, अशी प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी याप्रसंगी दिली.