पुर्नविकासबाबत सल्लागाराची नियुक्ती
नवी मुंबई शहरात सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता २००५ पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने घेतला घेतला आहे . याकरता सल्लागार यांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून इमारत संरचना योजना आखण्यात येणार आहे. बाजार समितीच्या घटकांसमोर पुनरर्विकास आराखड्याचे सादरीकरण मांडण्यात येणार असून , मंजुरीनंतर पूढील निर्णय घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : किल्ली कपाटालाच राहीली, चोरांनी मारला डल्ला, १८ लाखांची चोरी
सन १९८२ मध्ये कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून २००५ पासून वर्षानुवर्षे धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. पुनर्बांधणीमध्ये व्यापाऱ्यांनी वाढीव एफएसआय मागणी केली आहे. विविध कारणांनी कांदा बटाटा पुनविकास रखडला आहे. गेल्या वर्षभरापासून कांदा बटाटा बाजाराचा पुनविकास मार्गी लागेल अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नसून नुकतेच एपीएमसी संचालक मंडळाने बैठक घेऊन कांदा बटाटा व भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला या पाचही बाजार समितीचा पुर्नविकास पुनविकास एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्याने बांधा आणि वापरा तत्वावर हा पुनर्विकास होणार असून त्याकरिता एपीएमसी संचालक मंडळाने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पनवेल: भाजपची माजी नगरसेविकेच्या पतीविरोधात कारवाई
सल्लागारकडून पाचही बाजाराचा बांधणी आराखडा तयार करून घेण्यात येणार असून यामध्ये पुढील ५०-१०० वर्षांचा विचार करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा, पार्किंग व्यवस्था नियोजन आखण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत सल्लागाराकडून हा आराखडा तयार करून घेण्यात येणार असून त्यांनतर बाजार घटकांपुढे समितीसाठी ठेवण्यात येणार आहे. सल्लागाराने दिलेल्या आराखड्याला मंजुरी मिळाली तरच सल्लागारांना त्या आराखडा सादरीकरणाचा मोबदला दिला जाणार आहे अशा अटी शर्थीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती धान्य बाजार संचालक निलेश विरा यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत एपीएमसी बाजार समितीच्या पुनर्विकासाचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा बाजार घटकांना आहे. एपीएमसी पाचही बाजार समितीतिल इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या बाजारांचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमला असून येत्या दोन ते तीन महिन्यांत हा आराखडा तयार करून घेण्यात येईल. पुनर्विकास करताना आगामी ५० ते १०० वर्षांचा विचार करून अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त बाजाराची उभारणी करण्याचे नियोजन आहे. – अशोक डक, सभापती, एपीएमसी