३ आरोपीना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नेरुळ येथील बांधकाम व्यवसायिक शेखर तांडेल यांच्या बंद घराच्या किचनच्या ग्रिलचे ३ गज तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील ८४ लाख रुपयांचा ऐवज पळून नेला. या घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश सहा, देवसिंग ठाकुरिया, गणेश सहा अशी असून अन्य आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत.
या गुन्ह्य़ाचा तपास करीत असताना तांडेल यांच्या घराशेजारील सोसायटीचा वॉचमन राजेश अमर सहा याच्याकडे चोरी होण्याच्या काळात ३ ते ४ मित्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करुन सोडून दिले. मात्र या सुरक्षा रक्षकाचा संशय असल्याने पोलिसांनी त्याच्या हालाचलींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
३ डिसेंबर रोजी हा सुरक्षा रक्षक मिरारोड येथे गेला. त्यावेळी तेथील एका घरातून तो अनोळखी इसमासह बॅग घेऊन जात असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता मिरा रोड येथील भवानीसिंग ठाकूरीया याच्याकडे असणाऱ्या बॅगेत १५ लाख १३ हजार रुपयांची रोकड सापडली. एवढया मोठय़ा रकमेबाबत कोणताही समानधानकारक खुलासा दोघांनाही करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पकडलेल्या चोरटय़ाकडे अधिक चौकशी केली असता तांडेल यांच्या घरातील चोरीशी त्यांचा संबंध असल्याचे उघड झाले.
चौकशीमध्ये आणखी आरोपींची नावे त्यांनी उघड केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. सदर गुन्ह्य़ातील आरोपी देवसिंग ठाकूरीया याच्यावर नेपाळ येथे खुनाचा गुन्हा दाखल असल्याची व त्याच्यासह सर्वानी मिळून पंजाब, गुजरात, मुंबई इत्यादी ठिकाणी घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.