पनवेल: खारघर वसाहतीमधील चो-यांचे प्रमाण कमी होत नाही. पोलीसांचे अपुरे मनुष्यबळ हे एक कारण आहेच. मात्र पोलीसांपेक्षा चोरांची बंद घरांवर टेहळणी करणारी टोळी अधिक सक्रीय झाल्याचे उजेडात येत आहे. खारघरमधील सेक्टर १९ येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान एका बंद घरात शिरुन चोरट्यांनी सोनेचांदीचे दागीने व रोखड लंपास केली.
संदीप पटेल यांच्या घरात ही चोरी झाली असून पटेल यांनी खारघर पोलीसांना दिलेल्या तक्रारीनूसार घरात कोणीही नसताना गुरुवारी दुपारी चोरट्यांनी घराच्या सूरक्षा दरवाजाची कडी तोडून मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली. तब्बल पावणेचार लाख रुपयांची या घरफोडीतील आरोपींना शोधण्यासाठी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी खास पथक नेमले आहे.