नेरुळ-खारकोपर रेल्वे सुरू झाल्याने बस, रिक्षा प्रवासाकडे पाठ; एनएमएमटीच्या उत्पनात घट

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

नेरूळ ते खारकोपर उपनगरीय रेल्वे सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. बामनडोंगरी स्थानकावरून सोमवारी १९ हजार तर मंगळवारी १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. दररोज एकवीस हजार प्रवासी प्रवास करीत होते, ते आता सहा हजारांनी कमी होवून दोन लाख सत्तर हजरांचे उत्पन्न एक लाख नव्वद हजारांवर आले आहे. तसेच पूरक वाहतूक सेवा देणाऱ्या रिक्षा, टाटा मॅजिका यांचे पूर्ण गणितच बिघडले आहे.

दक्षिण नवी मुंबईला जोडणाऱ्या नेरुळ-उरण मार्गावरील पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर या मार्गाचे रविवारी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोमवारपासून या मार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू झाली. बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकाच्या परिसरातील नागरिकांनी प्रवासासाठी सहज, स्वस्त आणि जलद गतीने प्रवासासाठी रेल्वेला पसंती देत आहेत.

दिवाळीच्या पाच दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या नोकरदारांनी या सेवेला प्राधान्य दिले. गेल्या तीन दिवसांत या मार्गावरून हजारो प्रवाशांनी प्रवास केला.  रेल्वे सुरू होण्याआधी एनएमएमटीच्या नेरुळ स्थानकापासून बामणडोंगरी स्थानकाकडे १७ क्रमांकाची बस, बेलापूरवरून २३ क्रमांकाची बस, तर वाशीवरून १८ क्रमांकाची बस सुरू आहे. नेरुळ, जुईनगर, बेलापूर स्थानकांच्या पूर्वेकडून खासगी टाटा मॅजिका गाडय़ांच्या रांगा तसेच रिक्षा बामणडोंगरी तसेच खारकोपर स्थानकापर्यंत जात असत. एनएमएमटीच्या नेरुळ व जुईनगर स्थानकातून उलवे, उरणकडे जाणाऱ्या बससेवेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. नेरुळ स्थानकाकडे बामणडोंगरीहून रात्री साडेबाराची शेवटची बस येत होती. मात्र बससेवा ठरलेल्या वेळीच असल्याने लवकर घर गाठण्यासाठी प्रवासी रिक्षा आणि टाटा मॅजिकाला प्राधान्य देत होते. एनएमएमटी बसचे भाडे १७ रुपये, तर रिक्षा व टाटा मॅजिकावाले प्रवाशांकडून २५ रुपये घेत असत. तसेच मीटरवर रिक्षा केल्यास १२५, तर अवेळी १५० ते २०० रुपये घेतले जात. या परिसरातील प्रवाशांना एनएमएमटीच्या बस, रिक्षा आणि टाटा मॅजिका या खासगी गाडय़ांद्वारे प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यामुळे उलवे परिसरात राहणारे नागरिक रेल्वेसेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारपासून रेल्वेसेवा सुरू झाली. त्याचा नवी मुंबई परिवहन सेवेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काही रिक्षाचालकांनीही उत्पन्नावर परिणाम झाल्याचे सांगितले.  तुलनेने रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि आरामदायी आहे. रेल्वेचे खारकोपर ते नेरुळ आणि बेलापूपर्यंतचे तिकीट फक्त ५ रुपये आहे. त्यातून वेळेचीही मोठी बचत होत आहे. आगामी काळात प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रेल्वेने अधिक फेऱ्या वाढवल्या तर खासगी वाहतुकीला फटका बसणार असल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

दररोज सुमारे तीस हजार प्रवासी

सोमवारपासून नियमितपणे नेरुळ ते खारकोपर मार्गावर २० आणि बेलापूर ते खारकोपर मार्गावर २० फेऱ्या चालविण्यात आल्या. यात प्रकल्पातील बामनडोंगरी स्थानकातून प्रवाशांनी मोठय़ा प्रमाणात प्रवास केला आहे.

बामनडोंगरी

सोमवारी बामनडोंगरी स्थानकातून ३,५१५ तिकिटांची विक्री झाली असून ११ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यामधून एक लाख दोन हजार रुपये उत्पन्न मिळाले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २,७५० तिकिटांची विक्री होताना १८ हजार प्रवाशांनी बामनडोंगरीतून प्रवास केला. बुधवारी २ हजार ७११ तिकीटांची विक्री होवून ५ हजार ४४१प्रवाशांनी  प्रवास केला.

खारकोपर

१२ नोव्हेंबर रोजी खारकोपर स्थानकात १,५३७ तिकिटे विकली गेली असून एकूण ७,६४७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून ४४ हजार ९५२ रुपयांची कमाई झाली आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत साडेतीन हजार प्रवाशांनी खारकोपर स्थानकातून प्रवास केल्याचे सांगण्यात आले. बुधवारी १ हजार ९९ तिकीटांची विक्री होवून ३ हजार४३४ प्रवाशांनी प्रवास केला.

* बामणडोंगरी स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण याच स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या विविध सेक्टरमध्ये लोकवस्ती अधिक आहे. याच स्थानकाच्या परिसरात सिडकोचा उन्नती प्रकल्प आहे. तिथेही रहिवाशांची मोठी संख्या आहे. त्यामानाने खारकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूला अद्याप मोठी लोकवस्ती नसल्याने या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे.

एनएमएमटीच्या उलवे आणि उरण परिसरांत नेरुळ, बेलापूर, वाशी या ठिकाणांहून बसगाडय़ा चालतात. आतापर्यंत एनएमएमटीचे चांगले उत्पन्न होत होते. मात्र रेल्वे सुरू झाल्यामुळे या मार्गावरील उत्पन्न २५ टक्क्यांनी घटले आहे. तसेच उलवे परिसरातील अंतर्गत वाहतुकीसाठी १६ क्रमांकाची बस बामणडोंगरी ते खारकोपर स्थानकांदरम्यान सुरू केली आहे.

– शिरीष आदरवाड,व्यवस्थापक, नवी मुंबईपरिवहन उपक्रम

रविवारी नेरुळ तसेच बेलापूर ते खारकोपपर्यंत रेल्वे सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ए.के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी

रेल्वे सुरू होण्यापूर्वी आमचा व्यवसाय चांगला सुरू होता. मात्र आता प्रवासी मिळत नाहीत. दिवसातून तीन-चार फेऱ्या उलवे परिसरात व्हायच्या. त्या आता निम्म्यावर आल्या आहेत.

 नितेश कोळी, रिक्षाचालक, कोंबडभुजे