नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग सहाकरिता येत्या रविवारी, १७ एप्रिलला मतदान होईल. राष्ट्रवादीच्या नगरसेविका राजबली यादव यांचा जात पडताळणी अर्ज न्यायालयाने बाद ठरवल्याने या प्रभागासाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीतर्फे संध्या यादव, तर काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने पुरस्कृत अपक्ष उमेदवार मधुमती पाल या निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, तर राष्ट्रवादीची हुकमत मोडून काढण्यासाठी, विशेषत: माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना शह देण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. उत्तर भारतीय नागरिकांची बहुसंख्या असलेल्या या प्रभागासाठी राष्ट्रवादीने आणि विरोधी गटाने डझनभर वरिष्ठ नेतेमंडळी प्रचारात उतरवले आहेत.

येत्या रविवारी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया एकाच दिवशी होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर ७ वाजता मतमोजणी होणार आहे.