शेखर हंप्रस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदी सुसह्य़ करण्यात दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही संच सर्वानाच उपयोगी पडला. मात्र,  निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने केबल सेवा कोलमडली आहे.  ग्रामीण भागातील छोटय़ा केबलचालकांची (इनपुटर) व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. घरोघरी केबलद्वारे सुरू असलेल्या वाहिन्यांचे जाळे विस्कटलेले आहे. टाळेबंदीत केबल उपलब्ध झाली नाही. त्यात संसर्गाच्या भीतीने तंत्रज्ञ गावी गेल्याने मनुष्यबळाची उणीव भासत आहे.

टाळेबंदीत टीव्ही केबल आणि इंटरनेटची सुविधा निर्विघ्नपणे पुरविण्यासाठी करोना वातावरणातही तंत्रज्ञ काम करीत होते. आता निसर्ग वादळाच्या तडाख्याने हा व्यवसाय कोलमडला आहे. पनवेल ग्रामीण आणि उरण भागात केबल व्यावसायिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर नवी मुंबईतील  सुमारे ५० टक्के केबल सेवा बंद पडली होती. मात्र, दोन दिवसांत पूर्ण सेवा सुरळीत झाली.

पनवेल, उरण आणि पनवेल ग्रामीण, उरण ग्रामीण भागातील शेकडो गावांतील सुमारे ६० हजार घरांमधील केबल जागोजागी तुटल्या आहेत. वादळी वाऱ्यात झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने तसेच पत्रे उडून केबलवर पडल्याने त्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी तर भिंती कोसळल्या आहेत. याशिवाय विद्युत खांबांच्या आधारे उभारण्यात आलेल्या केबलही तुटल्या आहेत.

ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. ही अडचण आहेच, पण वादळाच्या तडाख्यात केबलचे जाळे उद्ध्वस्त झाले आहे. ते नव्याने उभे करण्यासाठी शेकडो किलोमीटर नव्याने केबल टाकाव्या लागणार आहेत. ग्रामीण भागात छोटय़ा केबलचालकांकडे दीडशे ते दोनशेच्या जोडण्या आहेत.