लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने उष्माघातापासून त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्याने केले आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातील विविध भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. उष्णेतेची लाट ही एक मूक आपत्ती आहे. साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी ४५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामुळे याचा माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांनाही त्रास होतो.
उष्णतेच्या बचावासाठी डोके झाकून ठेवावे व थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर आवश्यक करावा.घरातून बाहेर पडताना उन्हात बाहेर जाताना बूट किंवा चप्पल घालाव्यात. तसेच हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावा थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्या यासाठी दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत, विशेषतः घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या नागरिकांनी खबरदारीचा भाग म्हणून ‘काय करावे’ व ‘काय करू नये’ या संदर्भातील सूचनांचे पालन करावे आणि उष्माघात संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास त्वरित नमुंमपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.