स्थूलता, बैठे काम, व्यायामाचा अभाव, उशिरा होणारे विवाह व विलंबाने बाळंतपण, स्तनपान न देणे, व्यसनाधीनता अशा जीवनशैलीतील दोषांमुळेच स्तनांच्या कर्करोगाची शक्यता अधिक बळावते, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलिमा तांडेकर यांनी मांडले. वाशी येथील स्टर्लिग वोक्हार्ड्ट रुग्णालयाने कळंबोली येथील अमरांते सोसायटीत रविवारी आयोजित केलेल्या कर्करोग जनजागृती शिबिरात त्या बोलत होत्या.
महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व यामुळे त्यांच्या आजाराचे निदान उशिरा होते. प्रत्येक महिन्यात स्व-स्तन परीक्षण, दरवर्षी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्तनांची तपासणी व चाळिशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. या नियमित तपासण्यांमुळे स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान शक्य आहे आणि त्यातून रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमधील सर्वेक्षणातून हे प्रमाण दर लाखांमध्ये ३० ते ३५ टक्के एवढे आढळून आले आहे, अशी माहितीही डॉ. तांडेकर यांनी दिली.
स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा ‘पिंक रिबन मंथ’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पाश्र्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी त्यात सहभागी होत या आजाराविषयी माहिती घेतली.