कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम पोलीस बळ आणि सक्षम पोलीस ठाणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
पोलिसांना अधिक सुविधा मिळणे गरजेचे असून गुन्हेगारांची यंत्रणा पोलिसांपेक्षा अधिक आधुनिक असल्याची कबुली शिंदे यांनी या वेळी दिली.
ही त्रुटी दूर करण्यासाठी भविष्यात पोलिसांना अधिक सक्षम यंत्रणा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपल्या सागरी सुरक्षा व्यवस्थेतही काही कमतरता आहे, त्या उणिवाही दूर केल्या जातील असे ते म्हणाले. नवी मुंबईत येऊ घातलेल्या विमानतळ, नैना प्रकल्प, न्हावा शेवा, सी लिंक आणि जेएनपीटी आदींच्या दृष्टीने या पोलीस ठाण्याचे अधिक महत्त्व आहे, यामुळे नवी मुंबईत अधिकाधिक पोलीस बळ उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेलापूर सेक्टर १५ मधील पामबीच मार्गाजवळील १२०० चौरस मीटरच्या विस्तीर्ण भूखंडावर हे पोलीस ठाणे उभारण्यात आले असून यासाठी ३ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ किलोमीटरचा भाग येतो. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे पोलीस ठाणे महत्त्वाचे असून त्यात १० पोलीस आधिकारी व ७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा