गुरुवारी मध्यरात्री उशीरा नवी मुंबईत झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. नेरूळ भागात हा अपघात झाला. एका कारची ट्रॉलीला धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला असून घटनास्थळाचा व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेकडून एक्सवर (ट्विटर) पोस्ट करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
पीटीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक कार रस्ता दुभाजक ओलांडून थेट पलीकडच्या बाजूच्या मोठ्या ट्रॉलीखाली घुसल्याचं दिसत आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे प्रचंड वेगात ही कार ट्रॉलीला धडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओमध्ये कारचा क्रमांक एमएच ४३ बीई ५८७२ असल्याचं दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कारचा पुढचा भाग पूर्णपणे ट्रॉलीच्या खाली गेला आहे.
दरम्यान, अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघातानंतर काही आसपासच्या लोकांनी कारमधून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयातही पोहोचवण्यात आलं. मात्र, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.