नवी मुंबई: आजकाल झूम अॅपद्वारे गाडी भाड्याने दिली जात असल्याने गाडी मालकांना बसल्या जागी चांगली कमाई होत आहे. मात्र आपले वाहन खरेच सुरक्षित आहे का ? याची खात्री आवश्यक आहे. नवी मुंबईतील एका व्यक्तीची गाडी झूम अॅपद्वारे भाड्याने दिली खरी. मात्र गाडी भाड्याने घेणाऱ्याने गाडी चोरी केली. त्यात अत्याधुनिक प्रणालीद्वारे गाडीचा शोध लागला मात्र कंपनीच्या हलगर्जीपणाने तेथूनही गाडी घेऊन पळून जाण्यात चोर यशस्वी ठरला…
दूरदर्शनमध्ये काम करणारे राजीव सिंग यांनी झूम अॅप कंपनीद्वारे गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला. ११ तारखेला राजीव यांनी झूमद्वारा आलेल्या ग्राहकाला त्यांची कार दिली. मात्र ठरल्याप्रमाणे १२ तारखेला गाडी परत न आल्याने राजीव यांनी झूम ग्राहक सेवा केंद्रात तक्रार केली. मात्र दुर्दैवाने गाडी ट्रॅकिंग प्रणालीच काढून टाकल्याने गाडी कुठे आहे हे माहिती पडले नाही.
आणखी वाचा-नवी मुंबईत परदेशी नोकरीच्या बहाण्याने ११२ जणांची ८१ लाखांची फसवणूक
राजीव यांनी गाडीतील म्युझिक मशीनमध्ये एक प्रणाली जोडली होती. त्यादारे जर कोणी हॉट स्पॉटद्वारे म्युझिक सिस्टीम सुरु केली तर गाडीचे ठिकाणी राजीव यांच्या मोबाईल वर दर्शविले जाते. नेमके चोरट्याने गाडीतील म्युझिक सिस्टीम सुरु केल्यावर राजीव यांना गाडी प्रभात वसाहत नाशिक येथे असल्याचे कळले. त्यांनी ही माहिती झूम कंपनीला दिली. झूमने तात्काळ गाडी जवळ आपला प्रतिनिधी पाठवला. गाडी आढळून आली. मात्र टोइंग करण्यासाठी टोइंग व्हॅन शोधण्यासाठी झूम प्रतिनिधी तेथून गेला आणि त्याचवेळी चोरटा गाडी घेऊन गेला. त्यामुळे हाती आलेली गाडी पुन्हा चोरी झाली. तसेच ज्या ग्राहकाने गाडी भाड्याने नेली, त्याच्या आधारकार्ड वरील पत्ता शोधून पाहणी केली असता प्रकाश येलुरे यांचे आधारकार्ड वापरून अन्य व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने भाड्याचा बहाणा करून गाडी भाड्याने घेतली असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राजीव यांनी गाडी भाड्याने नेणारा ग्राहक आणि हलगर्जीपणाने हाती आलेली गाडी पुन्हा चोरी झाली म्हणून झूम कंपनी विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
आणखी वाचा-मुंबईचा वैद्यकिय कचरा आता रायगडात, देवनारची दुर्गंधी कमी होणार ?
झूम कंपनीचे मुख्यालय बेंगलोर येथून असून सदर कंपनीचे काम पूर्णतः ऑनलाईन चालते. ज्याला गाडी भाड्याने हवी तो आपली मागणी अॅपवर नोंदवतो. सोबत स्वतःचा आणि आधारकार्डचा फोटो, पत्ता, वैगरे माहिती दिली जाते. ही माहिती गाडी मालकाला पाठवली जाते. त्यानंतर दिलेल्या वेळेत ज्याला गाडी हवी तो गाडी घेऊन जातो. गाडीला ट्रॅकिंग प्रणाली असल्याने गाडी कुठे हे कळते तसेच गाडी बंद व सुरूही करता येत असल्याने गाडी सुरक्षित मानली जाते. मात्र चोरट्यांनी त्यावरही मात केल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.