शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास एपीएमसीतील एका व्यापाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोर आपल्या सोबत डीव्हीआर घेऊन गेले आहेत. हा हल्ला भिशीच्या पैशाच्या वादातून झाला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात जबाब घेण्याचे काम सुरु असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात आले.
एपीएमसी फळ बाजारात जी १९८ येथील गळ्यावर दुपारी चार वाजता एक दहा ते बारा जणांचे टोळके आले व त्यांनी येथील व्यापाऱ्याला मारहाण सुरु केली. कार्यालयाची तोडफोड ही करण्यात आली असून हा प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालला. हे करत असतानाच त्यातील काही जण संगणकाचा सीपीयू आणि डीव्हीआर सोबत घेऊन गेले. या ठिकाणी काम करत असलेल्या एका कामगाराने दिलेल्या माहिती नुसार प्रमोद पाटे असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तीन लाख वारंवार मागून न दिल्याच्या कारणातून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. या बाबत एपीएमसी पोलीस ठाणे यांना विचारणा केली असता घडलेल्या प्रकाराला त्यांनी दुजोरा दिला. तसेच हा प्रकार चार वाजता घडला आहे. सध्या जबाब घेण्याचे काम सुरु असून रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल होईल अशी माहिती दिली.
हेही वाचा: नवी मुंबईत १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर उद्यानात बलात्कार
भिशीतून झालेला प्रकार : एपीएमसी मधील अनेक व्यापारी मासिक भिशी लावतात. यात भिशी जो चालवतो त्याच्यावर पैशांची जवाबदारी असते. अशीच जिम्मेदारी सदर व्यापाऱ्याने स्विकारली होती. मात्र करोना काळात व्यवसायाचे गणित बिघडल्याने काही जणांना पैसे मिळाले नाहीत. अशाच एका व्यापाऱ्याला पैसे न मिळाल्याने व वारंवार मागितल्यावरही दाद न दिल्याने अखेर त्याने त्या व्यापाऱ्याच्या कार्यालावर १० ते १२ जणांच्या टोळल्यासह हल्ला केला अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली.